मराठी एकजुटीचे राज आणि उद्धव ठाकरेंचे आवाहन: 'भाषेच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरा!'
मुंबई, ०५ जुलै २०२५: आज मुंबईतील वरळी येथे झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर राज्यातील सर्व नागरिकांना पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. सुमारे २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेल्या या दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. व्यासपीठावर एकत्र दाखल होताच उपस्थितांनी मोठा जल्लोष केला.
मेळाव्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या भाषणाने झाली. राज्यातील जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा डाव सुरू असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यावर बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचे उदाहरण दिले. इंग्रजी माध्यमात शिकूनही त्यांच्या मराठी प्रेमावर कुणीही शंका घेऊ शकले नाही, असे सांगत भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी कुठल्या भाषेत शिक्षण घेतले हे महत्त्वाचे नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, भाषेच्या मुद्द्यावरून उगाच मारहाण न करण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाषणाचा समारोप करताना त्यांनी 'मराठी, मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्द्यावर तडजोड होणार नाही' हे ठामपणे सांगितले.
त्यानंतर भाषणाला आलेल्या उद्धव ठाकरे यांनी 'भाषणापेक्षा एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे' असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आतापर्यंत राजकारण्यांनी मराठी माणसांचा वापर करून त्यांना फेकून दिल्याचे ते म्हणाले. संकटात मराठी माणूस एकत्र येतो आणि संकट टळल्यावर एकमेकांशी भांडतो, यापुढे अशा डावांना बळी न पडण्याचे आवाहन करत, सर्व पक्षांतील मराठी माणसांनी एकत्र यावे, असे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र सक्तीच्या विरोधात आहोत. त्यामुळे कुणावरही दादागिरी करणार नाही, पण जर कुणी दादागिरी केली तर ती सहनही करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठीची सक्ती केली, मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन केले, मात्र या गोष्टी नंतर खोळंबल्याचा दावाही त्यांनी केला.
या मेळाव्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले, भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीय आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनीही या मेळाव्याला हजेरी लावली होती.
Politics, Maharashtra, Marathi Language, Rally, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Shiv Sena (UBT), MNS, Mumbai
#MarathiEkjoot #UddhavThackeray #RajThackeray #MaharashtraPolitics #MarathiBhasha #ThackerayBrothers #MumbaiRally #MarathiAsmita

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: