पुणे, दि. १३: हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित यंत्रणांना दिल्या. या भागात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्या आणि पुणे मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी केल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार शंकर मांडेकर, विभाग आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, मुख्य अभियंता श्रीमती रिनाज पठाण, एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्याधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, या परिसरातील कचऱ्याची समस्या तात्काळ दूर करून ज्या भागात कचरा साचला आहे, तो तात्काळ उचलण्यात यावा. आयटी पार्कच्या परिसरात असलेले ओढ्यांचे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे. ते अतिक्रमण संबंधित यंत्रणांनी तात्काळ काढून ओढे स्वच्छ करून त्याचे नैसर्गिक स्त्रोत मोकळे करावेत. या भागातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता नव्याने सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने बांधकाम आराखडा तयार करावा. या कामासाठी महसूल प्रशासन, एमआयडीसी, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी व स्थानिक लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
माण ग्रामपंचायत हद्दीत माण देवीच्या मंदिरालगत असलेल्या ओढ्यावरील बांधकामाचे अतिक्रमण जिल्हा परिषदेने तात्काळ हटवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मेट्रो कारशेडजवळ असलेल्या लक्ष्मी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. लक्ष्मी चौकात पिंपरी येथील भक्ती शक्ती स्थळासारखे स्थळ उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. रिंग रोड वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत सर्वोच्च प्राधान्याने काम करावे, तसेच कॅपजेमिनीजवळ पर्यायी रस्ता बनवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
नैसर्गिक ओढे-नाल्यांभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत आहेत.
पुणे मेट्रो लाईन ३ चे काम गतीने पूर्ण करा
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीपूर्वी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पद्मभूषण चौकातील पुणे मेट्रो लाईन ३ स्थानक - क्रोमा, हिंजवडी, डॉलर कंपनी, कोहिनूर मदर सन आदी भागातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
बैठकीच्या शेवटी श्री. म्हसे यांनी रिंग रोडच्या कामाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला महसूल, सार्वजनिक बांधकाम, प्रदूषण नियंत्रण, एमआयडीसी, पोलीस, पीएमआरडीए आदी विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Ajit Pawar, Hinjawadi IT Park, Pune Metro, Infrastructure, Urban Development, Traffic Management
#AjitPawar #Hinjawadi #PuneMetro #UrbanPlanning #TrafficSolutions #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: