पिंपरी चिंचवड मनपा आणि टाटा स्ट्राईव्हचा संयुक्त उपक्रम; ८ फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान
पिंपरी, ९ जुलै २०२५ (प्रतिनिधी): महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह (Tata Strive) यांनी तयार केलेल्या 'SHG ई-पोर्टल'वरील 'सक्षमा' पेजचे उद्घाटन आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे महिलांना स्वतःच्या हातांनी बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.
'सक्षमा प्रकल्पा' अंतर्गत महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या या ई-पोर्टलवरील 'सक्षमा' पेजच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरघे, तसेच टाटा स्ट्राईव्हचे प्रतिनिधी अमेय वंजारी, बिचिथा जॉयसे, स्नेहल विचारे, सचिन उपाध्याय, संतोष डोंगरे, अश्विनी सांगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या नव्या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. सक्षमा प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ८ महिला फेडरेशनची स्थापना करण्यात आली असून, या फेडरेशनद्वारे महिलांना व्यावसायिक संधी आणि सक्षमीकरणासाठी भक्कम आधार देण्यात येत आहे.
कार्यक्रमादरम्यान, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. या वस्तूंमध्ये स्थानिक, हस्तकलेच्या आणि उपयुक्त गृहवस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रोत्साहनपर सन्मानही करण्यात आला.
सन्मान झालेली महिला फेडरेशन्स:
अ क्षेत्र: संजीवनी फेडरेशन – अध्यक्ष: असमा मुलानी, सचिव: कविता खराडे, खजिनदार: विभा इंगळे
ब क्षेत्र: उडान फेडरेशन – अध्यक्ष: वर्षा सोनार, सचिव: अनिता मठपती, खजिनदार: वैशाली घाटके
क क्षेत्र: स्वरूपा फेडरेशन – अध्यक्ष: सिंधू किवळे, सचिव: स्नेहा गिरधारी, खजिनदार: संध्या परदेसी
ड क्षेत्र: आरंभ फेडरेशन – अध्यक्ष: उषा काळे, सचिव: मीनल ठेंगे, खजिनदार: मीनाक्षी शेट्टीवार
इ क्षेत्र: झेप फेडरेशन – अध्यक्ष: रेखा सोमवंशी, सचिव: संगीता सस्ते, खजिनदार: उर्मिला वाकचौरे
फ क्षेत्र: एकता फेडरेशन – अध्यक्ष: उमा साळवीकर, सचिव: रेश्मा घुले, खजिनदार: कमल सोनवणे
ग क्षेत्र: गरुड झेप फेडरेशन – अध्यक्ष: माधुरी भोसले, सचिव: सुवर्णा सोनवळकर, खजिनदार: लता गायकवाड
ह क्षेत्र: अल्फा फेडरेशन – अध्यक्ष: कोमल गावधनकर, सचिव: राखी धार, खजिनदार: रचना वारे
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, "पिंपरी चिंचवड शहरातील महिलांच्या शाश्वत विकासासाठी शाश्वत रोजगार अत्यावश्यक आहे. फेडरेशन निर्मितीद्वारे महिलांना उद्योगशीलतेच्या संधी मिळणार असून, समाज विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई-पोर्टलमुळे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे."
उप आयुक्त ममता शिंदे यांनी नमूद केले की, "पिंपरी चिंचवड शहरातील महिलांमध्ये विविध कौशल्ये आहेत, परंतु त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. आजच्या डिजिटल युगात सक्षमा ई-पोर्टल हे त्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. समाज विकास विभागाच्या मार्फत शहरातील सर्व महिलांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न आहे."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: