उरण, १६ जुलै २०२५: उरण तालुक्यातील खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेल्या खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम आज, बुधवार १६ जुलै २०२५ पासून अखेर सुरू झाले. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले हे काम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे मार्गी लागले आहे. शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर ही तातडीची कार्यवाही झाली.
शिवसैनिकांचा रास्ता रोको करण्याचा इशारा
खोपटा-कोप्रोली रस्त्याची दुरवस्था आणि नागरिकांचे हाल याबाबत शिवसेनेने यापूर्वी पीडब्ल्यूडी अभियंता नरेश पवार यांची भेट घेऊन दुरुस्तीची मागणी केली होती. आज सकाळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आणि तालुका संघटक बी.एन. डाकी यांच्या नेतृत्वाखाली खोपटा पुलाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले. त्यांनी निदर्शने करून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.
अधिकारी आणि ठेकेदाराकडून कामाची हमी
शिवसैनिकांच्या आंदोलनाचा इशारा मिळताच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार, उपअभियंता नरेश सोनवणे आणि मे. पी.पी. खारपाटील कंपनीचे ठेकेदार राजा खारपाटील यांनी तात्काळ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आजपासूनच रस्त्याच्या कामाला सुरुवात होत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ठेकेदार राजाशेठ खारपाटील यांनी काम लवकरच पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
दोन वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी
मागील दोन वर्षांपासून शिवसेना या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न लावून धरत होती. मागील आमसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर काम लवकरच सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र चार महिने उलटूनही कोणतीही हालचाल झाली नव्हती. जनतेचे हाल पाहता प्रशासनाला आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली, असे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
जनप्रतिनिधींचा प्रशासनाला जाब
यावेळी तालुका संघटक बी.एन. डाकी, उपतालुका संघटक रुपेश पाटील, विभागप्रमुख भूषण ठाकूर, अनंता पाटील, वशेनीच्या सरपंच अनामिका म्हात्रे आणि बांधपाडाच्या माजी सरपंच तथा शिवसेना महिला तालुका प्रमुख भावना म्हात्रे आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरत जाब विचारला. या आंदोलनात माजी तालुका प्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, खोपटे शाखाप्रमुख नंदकुमार ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते, ज्यांनी घोषणाबाजी करत काही काळ रास्ता रोको केला.
Uran, Khopta Koproli Road, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray), Road Construction, Protest, PWD, Maharashtra Politics
#Uran #RoadWork #ShivSena #Maharashtra #KhoptaKoproli #Protest #PWD #LocalNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: