हिंजवडीसह सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे आदेश

 

आमदार शंकर जगताप यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

मुंबई, दि. ५ जुलै २०२५: पुणे जिल्ह्यातील मुळशी व मावळ तालुक्यातील सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करून त्यांचा शाश्वत विकास करण्याच्या मागणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना संबंधित विषयानुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवेळी खासदार श्रीरंग बारणे हेही उपस्थित होते.

ही आहेत सात गावे: हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी), सांगवडे व गहुंजे (ता. मावळ).

मागणीमागील प्रमुख कारणे: वाढता ताण आणि समन्वयाचा अभाव 

राजीव गांधी आयटी पार्कमुळे या परिसरात आयटी व औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आयटीयन्स व बाहेरील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. या सात गावांची एकत्रित तरंगती लोकसंख्या अंदाजे २ लाखांवर पोहोचली आहे. यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि वाहतूक यंत्रणा या मूलभूत सुविधांवर ताण वाढला आहे. विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे रखडली आहेत. यावर आमदार शंकर जगताप म्हणाले, "या भागांचा विकास ग्रामपंचायतीच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध नागरीकरणासाठी या गावांचा तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणे अत्यावश्यक आहे." २०१८ सालीच महापालिकेने या गावांच्या समावेशासाठी ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला होता, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

समावेश झाल्यास होणारे फायदे 

या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यास खालील महत्त्वपूर्ण फायदे होतील: १. एकसंध नागरी प्रशासनाखाली नियोजनबद्ध व शाश्वत विकास. २. समन्वित व जलद निर्णयक्षम व्यवस्था. ३. वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना. ४. आवश्यक नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध. ५. उद्योग व आयटी क्षेत्राला भरपूर सहकार्य. ६. शासनाच्या महसुलीत वाढ.

आमदार जगताप यांच्यासमवेत वसंत साखरे, प्रकाश बुचडे, बाबासाहेब साखरे, आनंद बुचडे, तानाजी हुलावळे, बाबासाहेब बुचडे, दिलीप हुलावळे, लहू गायकवाड, संजय जाधव, रोहन जगताप, विक्रम साखरे, सचिन लोंढे, सचिन शिधे आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच आयटीयन्स देखील होते. या विषयासंदर्भातील निर्णय त्वरित व्हावा यासाठी आमदार कार्यालय सातत्याने पाठपुरावा करत असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.


Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC, MLA Shankar Jagtap, CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde, Urban Development, Villages Inclusion, Pune, Maharashtra

 #Hinjawadi #PimpriChinchwad #PCMC #MLA_ShankarJagtap #CM_DevendraFadnavis #DCM_EknathShinde #UrbanDevelopment #Pune #Maharashtra #ITPark

हिंजवडीसह सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे आदेश हिंजवडीसह सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे आदेश Reviewed by ANN news network on ७/०७/२०२५ ०९:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".