उरण, दि. ३ जुलै २०२५: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांनी ठाम आश्वासन दिलं आहे. "नाव तर दिबांचंच देणार, अन्य कोणत्याही नावाचा विचार नाही," असं ते म्हणाले. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी या नावाचा ठराव पास करून केंद्राला पाठवला आहे, यावर त्यांनी भर दिला.
मंत्री मोहोळ आणि नामकरण कार्यकर्त्यांची भेट
आज मुंबईतील नवीन नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित जनता दरबारात राजेश गायकर (कामोठे), विनोद म्हात्रे (उरण - जासई), किरण पवार (कोल्ही कोपर) आणि शरद ठाकूर (माजी उपसरपंच धुतुम) या नामकरण कार्यकर्त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली.
या भेटीत, लोकनेते दि.बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याबाबत राज्य शासनाचा ठराव नागरी विमान उड्डयन मंत्रालयात पाठवण्यात आला असला तरी, विमानतळ सुरू होण्यापूर्वी या नामकरणाची घोषणा कधी होणार, हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी विचारणा केली. विनोद म्हात्रे यांनी यासंदर्भात एक निवेदनही केंद्रीय मंत्र्यांना दिलं.
घोषणेची प्रक्रिया आणि अफवांना पूर्णविराम
राजेश गायकर यांनी नामकरणाची घोषणा कधी होईल, याबाबत विचारल्यावर मंत्री मोहोळ यांनी सांगितलं की, "प्रधानमंत्री कार्यालयाकडून सदर प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटमध्ये पाठवला आहे. केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळताच तो आमच्या मंत्रालयाकडे परत येईल आणि तशी त्याची घोषणा होईल."
यावर विनोद म्हात्रे यांनी, "विमानतळाला अन्य नावाचा विचार होतोय का, अशी चर्चा काही लोक करत आहेत," अशी शंका व्यक्त केली. यावर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केलं की, "मा. दि.बा. पाटील नावाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही नावाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून आलेला नाही आणि केंद्राचाही अन्य कुठल्याही नावाचा विचार नाही." त्यांनी उपस्थितांना हे ठामपणे सांगितलं.
या स्पष्टीकरणामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे.
Navi Mumbai International Airport, Di Ba Patil, Naming Controversy, Central Government, Union Minister, Muralidhar Mohol, Maharashtra Politics, Local Leaders
#NaviMumbaiAirport #DiBaPatil #MuralidharMohol #AirportNaming #MaharashtraPolitics #Uran #CentralGovernment #Loknete

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: