भारती विद्यापीठ आणि आयबीएममध्ये सामंजस्य करार: उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा

 


विद्यार्थ्यांना मिळणार एआय, डेटा सायन्स, क्लाउड कंप्युटिंगसारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे शिक्षण

पुणे, ९ जुलै  : शैक्षणिक ज्ञान आणि औद्योगिक गरजांमधील दरी भरून काढण्याच्या उद्देशाने, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि आयबीएम (IBM) कंपनीच्या आयसीई (इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशन - Innovation Center for Education) उपक्रमाअंतर्गत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यकालीन कौशल्यांनी समृद्ध केलेले उद्योगाभिमुख पदवी आणि अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.

भारती विद्यापीठ परिसरात ७ जुलै २०२५ रोजी हा सामंजस्य करार संपन्न झाला. या प्रसंगी संजीव मेहता (सल्लागार व प्रमुख, कार्यक्रम विकास, आयबीएम, आयसीई), धवल शाह (संस्थापक व सीईओ, डेटागामी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रा. लि.), संजय डागा (पार्टनर व डायरेक्टर - सेल्स, डेटागामी), श्वेता शाह (वरिष्ठ व्यवस्थापक, अकॅडेमिया रिलेशन, डेटागामी) या आयबीएम आणि डेटागामीच्या प्रतिनिधींसह भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, शैक्षणिक व प्रशासकीय संचालक प्रविण पाटील, प्राचार्य राजेश प्रसाद (अभियांत्रिकी महाविद्यालय), अधिष्ठाता सुहास एच. पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाणडॉ. सुनीता जाधव आणि संगणक अभियांत्रिकी व आयटी विभाग प्रमुख डॉ. संदीप वंजाळे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना विठ्ठल माड्याळकर यांनी तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या गरजेवर भर दिला. संजीव मेहता यांनी आयसीई (ICE) कार्यक्रमांची शैक्षणिक रचना स्पष्ट केली. ते म्हणाले, "हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या मंजुरीनंतर सह-विकसित करण्यात आले असून, आयबीएमच्या डिजिटल कोर्सवेअरद्वारे समृद्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आयबीएम डिजिटल बॅजेस मिळतील. शिक्षकांसाठी टी थ्री ट्रेनिंग, रिमोट मेंटरिंग व लॅब सहाय्य उपलब्ध होईल. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिक, प्रकल्पाधारित आणि जागतिक रोजगार योग्यतेला अनुसरून असतील."

डॉ. विवेक सावजी यांनी या कराराला शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय औद्योगिक गरजांशी समन्वय साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जी. जयकुमार यांनी हा करार भविष्यात महाविद्यालयात उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करेल, जे औद्योगिक समस्यांवर उपाय शोधेल व समाजसेवा करेल, असे मत व्यक्त केले.

प्रविण पाटील आणि राजेश प्रसाद यांनी सांगितले की, "हा उपक्रम अभ्यासक्रम संरचना, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावर तयारी यामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे."

या अभ्यासक्रमांमध्ये एआय (AI), डेटा सायन्स (Data Science), क्लाउड कंप्युटिंग (Cloud Computing), ब्लॉकचेन (Blockchain) आणि सायबर सुरक्षा (Cyber Security) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. आयबीएमचे एलएमएस (LMS), डिजिटल टूलकिट्स आणि कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्म्सद्वारे विद्यार्थ्यांना वर्कशॉप्स, हॅकाथॉन, पोस्टर प्रेझेंटेशन्स आणि उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. आयबीएम आयसीई (IBM ICE) कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जागतिक मान्यता असलेले डिजिटल बॅजेस दिले जातील, जे त्यांच्या कौशल्यांची खात्री देतील आणि रोजगाराच्या संधी वाढवतील.


भारती विद्यापीठ आणि आयबीएममध्ये सामंजस्य करार: उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा भारती विद्यापीठ आणि आयबीएममध्ये सामंजस्य करार: उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा Reviewed by ANN news network on ७/०९/२०२५ १२:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".