पुणे, ता. ६ जुलै २०२५: पुणे पोलीस दलात लवकरच किमान एक हजार नवीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. सध्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू असून, त्यापैकी एक हजार उमेदवार पुणे पोलीस दलात सहभागी होतील, असे पाटील म्हणाले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन अंतर्गत विठ्ठलवाडी येथील 'आनंदनगर पोलीस चौकी'च्या इमारतीचे लोकार्पण करताना ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, दीपक मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वीरेंद्र केळकर, कीर्ती कुंजीर आणि मिथुन होवाळ उपस्थित होते.
एकत्रित प्रयत्न आवश्यक
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत." शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
हद्द वाढवून नागरिकांची गैरसोय टळली
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, "राजाराम पूल परिसरात पुणे शहर पोलिसांची हद्द संपत असल्यामुळे या भागातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हवेली पोलीस स्टेशनमध्ये जावे लागत होते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हद्द वाढवून घेण्यात आली आणि आरक्षित असलेल्या दोन जमिनींवर पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले." आज पोलीस चौकीचे लोकार्पण झाले असून, दोन महिन्यांत पोलीस स्टेशनचे कामही पूर्ण होईल, असे मिसाळ यांनी सांगितले.
पुणे पोलिसांच्या क्षमतांमध्ये वाढ
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गृह विभागाने पुण्यासाठी सात नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी दिली असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पोलीस दलात मनुष्यबळही वाढवले जात आहे. यामुळे पुणे पोलिसांच्या क्षमता वाढत असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पोलीस चौकीची जागा प्रशस्त आणि मध्यवर्ती ठिकाणी असून, महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्राम कक्ष आहेत. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमधील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी येथे सायबर कक्षही निर्माण करण्यात आला आहे. या इमारतीत स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन व्हावे, अशी विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
Pune Police, Police Recruitment, Anandnagar Police Chowki, Inauguration, Chandrakant Patil, Madhuri Misal, Amitesh Kumar, Law and Order, Cyber Crime Unit
#PunePolice #PoliceRecruitment #LawAndOrder #AnandnagarPoliceChowki #ChandrakantPatil #MadhuriMisal #Pune #SmartCity #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: