लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवाचे राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्व
पुणे, १० जुलै (प्रतिनिधी): गणेशोत्सवाला 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून अधिकृत मान्यता द्यावी आणि पुणे शहरासाठी या उत्सवाच्या नियोजनासाठी किमान १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ज्योती नारायण रासने यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
आमदार रासने यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या उत्सवाची सुरुवात १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामूहिक बळ देण्यासाठी केली होती, ज्याचा मुख्य उद्देश सामाजिक समरसता साधून लोकशक्ती एकत्र आणणे हा होता. हा उत्सव महाराष्ट्रातून देशभर पसरला असून, वर्षभर चालणाऱ्या विधायक सामाजिक कामांतून अनेक चांगले सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते घडले आहेत.
उत्सवाच्या प्रगतीसाठी आणि सोयी-सुविधांसाठी निधीची गरज: आमदार रासने यांनी पुणे शहरात गणेशोत्सव २४ तास चालण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली. सध्या उत्सवावर असलेल्या निर्बंधांमुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते, असे त्यांनी नमूद केले. वाढत्या गर्दीसाठी पोलिसांची संख्या मर्यादित असल्याने जादा कुमक आवश्यक आहे. तसेच, देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते, सुस्थितीतील पदपथ, आवश्यकतेनुसार स्ट्रीट लाईट, सुलभ सार्वजनिक शौचालय सुविधा (विशेषतः महिलांसाठी) आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन या व्यवस्था शासन यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.
पुणे शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि आयोजनासाठी: जी-२० परिषदेच्या वेळी पुणे शहर ज्याप्रमाणे सजवले होते, त्याच प्रकारची सजावट गणेशोत्सवामध्ये अपेक्षित आहे, असे रासने म्हणाले. पंढरपूरच्या वारीत राज्य शासनाने केलेल्या व्यवस्थापनाचे विरोधी पक्षातील आमदारांनीही कौतुक केले होते. त्याच धर्तीवर पुणे शहरात उत्सवाचे नियोजन करण्यासाठी राज्य शासनाने किमान १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस त्यांनी केली.
राष्ट्रीय एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व: गणेशोत्सवाचे राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व जाती, पंथ आणि धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होत असल्याने सामाजिक अभिसरण, सौहार्द आणि एकात्मतेला चालना मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत २०२४७' च्या स्वप्नातही या उत्सवाचे महत्त्व आहे. आज गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून, तो जगातील १७५ हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. या काळात अनेक परदेशी आणि देशांतर्गत पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. धार्मिक पर्यटनासाठी पुणे शहराच्या गणेशोत्सवाचा विचार करून पंढरपूरच्या वारीप्रमाणे स्वतंत्र नियोजन व निधीची तरतूद आवश्यक असल्याचे आमदार रासने यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: