पुणे, १७ जुलै २०२५: कोंढवा येथील भाजी विक्रेते आणि पथारी व्यावसायिकांना योग्य जागा मिळवून देण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी पुकारलेला सत्याग्रह अखेर यशस्वी झाला आहे. गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष, वाद आणि तक्रारींनंतर पुणे महानगरपालिकेकडून भाजी विक्रेते व पथारी व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शीतल पंप व कुमार पृथ्वी सोसायटी जवळील जागा उपलब्ध
इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आणि त्यांच्यासोबत सहभागी झालेल्या भाजी विक्रेते, पथारी व्यावसायिक व विविध सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने, शीतल पंपामागील जागा आणि कुमार पृथ्वी सोसायटीसमोरील ओटा मार्केटची जागा या व्यावसायिकांना पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोंढव्यातील या व्यावसायिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
सत्याग्रहाला विविध संघटनांचा पाठिंबा
असलम बागवान यांच्या या सत्याग्रही प्रयत्नांना नीलम अय्यर, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे काशीनाथ नखाते यांनी विशेष सहकार्य केले. याशिवाय, मासूम संस्था आणि जन आंदोलनाची राष्ट्रीय समन्वयक समिती यांनी पाठिंबा दिला. तसेच भारतीय काँग्रेस पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), जनशक्ती पार्टी, लोकसेना पार्टी, भारतीय रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही या सत्याग्रहात सक्रिय सहभाग नोंदवला. कोंढवा पोलीस स्टेशन, वानवडी रामटेकडी सह-उपायुक्त, अतिक्रमण विभाग अधिकारी आणि मालमत्ता विभागाचे सहकार्यही या प्रयत्नांना लाभले.
अतिक्रमण कारवाई विरोधात शांततापूर्ण संघर्ष
या संघर्षाची सुरुवात वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून झाली होती, ज्यामध्ये नंतर आठवडा बाजारावर कारवाई करून भाजी विक्रेते आणि पथारी व्यावसायिकांना हुसकावून लावण्यात आले. त्यांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले. संविधानातील अनुच्छेद १४, १५, १६, १९ (ग) आणि २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप करत, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांना बगल देत ही कारवाई झाल्याचे असलम बागवान यांनी म्हटले. या अन्यायाविरुद्ध असलम बागवान यांनी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह सुरू केला. या काळात व्यावसायिक आणि शेतकरी यांना बेरोजगारी आणि उपासमारीला सामोरे जावे लागले, तरीही एकाही व्यावसायिकाने कायदा आणि सुव्यवस्थेला तडा जाईल असे कृत्य केले नाही. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालत सत्याग्रह निरंतर चालू ठेवला.
सत्याचा विजय आणि सकारात्मक परिणाम
विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा, फोडण्याचा तसेच आमिषे दाखवूनही जेव्हा सत्याग्रही नमले नाहीत, तेव्हा बदनामी तसेच महिलांविरुद्ध अपशब्द वापरण्याचे कृत्यही झाले. परंतु, शेवटी सत्याचा विजय झाल्याचे असलम बागवान यांनी नमूद केले. या यशामुळे कोंढव्यातील अनेक व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Kondhwa, Pune, Aslam Bagwan, Satyagraha, Vegetable Vendors, Hawkers, Space Provided, Incredible Samajsevak Group, Social Movement, Pune Municipal Corporation
#Kondhwa #Pune #Satyagraha #AslamBagwan #VegetableVendors #Hawkers #SocialJustice #PuneNews #IncredibleSamajsevakGroup

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: