२५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान सॅनहोजे येथे दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन
मराठी चित्रपटसृष्टीला हॉलिवूडसदृश दर्जा मिळवून देण्याचा 'नाफा'चा प्रयत्न
सॅनहोजे (कॅलिफोर्निया), १० जुलै (प्रतिनिधी): मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानाने सादर करणाऱ्या 'नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन' (NAFA) तर्फे आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे, कॅलिफोर्निया येथे २५ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत रंगतदार सुरुवात होणार आहे. कॅलिफोर्निया थिएटर या प्रतिष्ठित स्थळी हा सोहळा आयोजित केला जाणार असून, यंदाचा महोत्सव अधिक भव्य आणि लक्षवेधी ठरणार आहे.
या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री अॅड. आशिष शेलार यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले होते, त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत तात्काळ होकार कळवला आहे. विशेष म्हणजे सॅनहोजे, कॅलिफोर्निया राज्याचे महापौर मा. मॅट महन यांनीही या महोत्सवास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. 'नाफा' संस्थापक अभिजित घोलप यांनी जाहीर केले आहे की, सॅनहोजेचे महापौर आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र येत असल्याने यंदाची 'अवार्ड नाईट' आणि महोत्सव विशेष ठरणार आहे.
'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे निर्माते तसेच सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात गेल्यावर्षी करण्यात आली होती. नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नुकतीच महाराष्ट्रात येऊन सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले होते.
'नाफा' हा उत्तर अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेला मराठी चित्रपटांसाठी स्थापन झालेला एकमेव मंच असून, मराठी चित्रपटांच्या व्यावसायिक आणि कलात्मक उन्नतीसाठी तो सतत कार्यरत आहे. अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीला हॉलिवूडसदृश दर्जा, ग्लॅमर आणि व्यावसायिक यश प्राप्त करून देण्यासाठी 'नाफा' कटिबद्ध आहे.
The second annual 'NAFA' Marathi Film Festival will kick off in San Jose, California, from July 25-27, 2025.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: