वाशिम, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'; गोदावरी नदीला पूर
पुणे, मुंबईसह कोकण, विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
पुणे, ९ जुलै (वार्ताहर): महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वाशिम, अमरावती, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा घाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे, अशी माहिती आपत्ती अनुषंगाने दैनंदिन सद्यस्थिती अहवालात देण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने सर्व यंत्रणा सक्रिय केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसाठी गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीचा 'येल्लो अलर्ट' देण्यात आला होता. गोदावरी नदी आज सकाळी ६.०० वाजता सामान्यपेक्षा जास्त पूर परिस्थितीत वाहत असून, संबंधितांना सूचित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात मुसळधार पावसामुळे काही काळासाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान: मागील २४ तासांत सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (सकाळी ११.०० वाजेपर्यंत):
भंडारा: ११४.५ मिमी
गोंदिया: ११०.६ मिमी
नागपूर: ७७.९ मिमी
गडचिरोली: ७७.५ मिमी
चंद्रपूर: ४२.२ मिमी
आपत्ती प्रतिसाद दलांची सज्जता: राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) एकूण १८ टीम विविध जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. यात मुंबईत ३, पालघरमध्ये १, रायगडमध्ये १, ठाण्यात २ (१ ठाणे व १ कल्याण), रत्नागिरीत १, सोलापूरमध्ये (आषाढी वारीसाठी) १, सांगलीत १, कोल्हापूरमध्ये १, सिंधुदुर्गात १, नागपूरमध्ये २ आणि पुणे मुख्यालयात २ राखीव टीमचा समावेश आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) एकूण ६ टीम तैनात असून, यात नागपूर, गडचिरोली, धुळे, नांदेड आणि सोलापूर (आषाढी वारीसाठी) येथे प्रत्येकी एक टीम आहे.
हवामान अंदाज (पुढील काही दिवस): भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या चार दिवसांच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
९ जुलै २०२५: पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे 'येल्लो अलर्ट'. रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, अमरावती येथे 'ऑरेंज अलर्ट'.
१० जुलै २०२५: रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, गडचिरोली येथे 'येल्लो अलर्ट'.
११ जुलै २०२५: पालघर, नाशिक घाट येथे 'येल्लो अलर्ट'.
समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये वादळी हवामानाची आणि समुद्रात उंच लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सखल आणि शहरी भागांत स्थानिक पातळीवर पाणी साचण्याची शक्यता असून, जुन्या आणि दुर्लक्षित इमारती कोसळण्याचा धोका आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: