'ऋतूगंध' संगीताविष्काराने रसिक मंत्रमुग्ध; भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनचा सांगीतिक कार्यक्रम उत्साहात
पुणे, दि. १२ जुलै २०२५: भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन आणि 'आरंभ, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ऋतूगंध' हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. सहा ऋतूंच्या सान्निध्यात निर्माण होणाऱ्या संगीतसौंदर्याची सुरेल मांडणी या कार्यक्रमातून करण्यात आली.
ऋतूंशी संबंधित निवडक कविता, संवाद आणि मराठी-हिंदीतील सुरेल गीतांचा मनोहारी संगम यावेळी रसिकांना अनुभवता आला. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निर्मिती शीतल दामले यांची होती. शीतल दामले व चिंतामणी केळकर यांनी संयतपणे सूत्रसंचालन केले.
कलाकारांचे दमदार सादरीकरण:
गायक कलाकारांमध्ये शेखर केंदळे, मीनल केळकर, समीर चिटणीस आणि प्रतिभा देशपांडे यांनी विविध ऋतूंना साजेशी गीते सादर करून श्रोत्यांना मोहिनी घातली. साथसंगत वाद्यवृंदात समीर बंकापुरे (तबला), प्रसन्न बाम (हार्मोनियम), किमया काणे व चिन्मय कुलकर्णी (सिंथेसायझर) आणि आदित्य आपटे (साईड रिदम) यांनी कलाकारांना उत्तम साथ दिली. भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे आणि डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सुरेश (काका) धर्मावत, रवी चौधरी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
गीतांची सुरेल मैफल:
'सूर निरागस हो' या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 'केतकी, गुलाब, जुही', 'मोगरा फुलला', 'नभ उतरू आलं', 'गरजत, बरसत सावन आयो रे', 'धुंदी कळ्यांना', 'थंडी हवाये, लेहेराके आये', 'मस्ती भरा ये समा' अशी एकाहून एक बहारदार गीते प्रभावीपणे सादर करण्यात आली. या सादरीकरणाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा २५२ वा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाला विविध मान्यवर, रसिक आणि संस्कृतीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश विनामूल्य असल्याने अनेक संगीतप्रेमींना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: