उरण, दि. १२ जुलै २०२५: उरण तालुक्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यात बळींची संख्याही वाढताना दिसत आहे. आज दुपारी उरण तालुक्यातील पागोटे गावाजवळील पुलावर झालेल्या एका भीषण दुचाकी अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एमएच-४३ सीजे-४०१० या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात घडला. दोघेही नवी मुंबई परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या धक्कादायक घटनेने उरणमधील स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुलावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांची अवस्था या अपघाताच्या तीव्रतेची साक्ष देत होती. वेळेवर मदत न मिळाल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. उरणमध्ये अपघातग्रस्तांना वेळेत प्राथमिक उपचार आणि सुविधा मिळत नसल्याने यापूर्वीही अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, ही काही पहिलीच घटना नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:
उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून, मृतदेह इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे.
मात्र, या घटनेमुळे प्रशासनाचा अपघातापूर्वीचा निष्क्रियपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. उरण परिसरात अपघातांची साखळी सुरूच आहे, याचा प्रत्यय पागोटे येथील घटनेने पुन्हा दिसून आला आहे. पागोटे परिसरातील पुलावर ना गतिरोधक, ना सीसीटीव्ही कॅमेरे, ना वेगमर्यादा यंत्रणा - अशा स्थितीत अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. "दर महिन्याला याच रस्त्यावर एक जीव जातोय, पण प्रशासनाकडे फक्त प्रेस नोट काढण्याची तत्परता आहे. अपघातापूर्वी उपाययोजना करण्यासाठी वेळ नाही, हे चित्र दुर्दैवी आहे. हे चित्र कधी बदलणार?" असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. "रस्ता आहे, वाहनं आहेत, पण सुरक्षा कुठे आहे?" असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: