महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही आवाजी मतदानानं मंजूर
महाराष्ट्र
विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या
अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली
होती. आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं. हा कायदा
नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगून यामागची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट
केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विधेयकाला विरोध
केला. नक्षलवाद, दहशतवादाला डावी किंवा उजवी विचारसरणी नसते. हा कायदा उजव्या अतिरेक्यांना
सोडणार का? यासंदर्भात आधीच अनेक कायदे असताना नवा कायदा आणायची गरज काय? एखाद्या संघटनेला
लक्ष्य करण्याचा यामागचा उद्देश आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अशा संघटनांना
बेकायदेशीर ठरवण्यासाठीचं सल्लागार मंडळ म्हणजे सरकारच्या हातातलं बाहुलं आहे, असा
आरोप त्यांनी केला. या विधेयकाबाबत राजकारणाच्या
पलीकडे जाऊन विचार करायची गरज असल्याचं मत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलं.
काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी ‘कडवी डावी विचारसरणी’ या शब्दाला आक्षेप घेतला. या
विधेयकाबाबत आलेले आक्षेप, सूचनांची सार्वजनिक सुनावणी का घेतली नाही, असा प्रश्नही
त्यांनी विचारला आणि काँग्रेस पक्षाचा विधेयकाला विरोध असल्याचं सांगितलं. भाजपाचे
प्रसाद लाड यांनी या विधेयकाला पाठिंबा देताना शिवसेनेविषयी केलेलं वक्तव्यावर आक्षेप
घेत विरोधकांनी सभागृहात गदारोळ आणि नंतर सभात्याग केला. त्यानंतर विधान परिषदेचं कामकाज
१० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर विरोधकांच्या
अनुपस्थितीत महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं.
आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने
महाबळेश्वर पोलादपूर मार्ग वाहतुकींसाठी बंद
रायगड
जिल्ह्यातल्या आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर पोलादपूर मार्ग वाहतुकींसाठी
बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला
आहे. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता
४ दिवस लागणार असल्याने १० जुलै ते १४ जुलैरोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या
वाहतूकीसाठी पूर्णतः बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली
आहे.
चीनमधल्या निकृष्ट दर्जाच्या
बेदाण्यांची आयात त्वरित थांबवण्यात यावी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्राकडे मागणी
चीनमधल्या
निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची आयात मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे द्राक्ष उत्पादक
शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे त्वरित ही आयात थांबवण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे
मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. या करचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून देशाच्या
महसुलाचं नुकसान होत आहे. ऐन हंगामात होत असलेल्या बेकायदा आयातीमुळे देशातल्या शेतकऱ्यांनी
उत्पादित केलेल्या बेदाण्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयाने घसरले आहेत त्यामुळे
बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी
आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
राज्यभरातल्या एकंदर ३
हजार ३६७ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आत्तापर्यंत हटवण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची
माहिती
राज्यभरातल्या
एकंदर ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आत्तापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेदरम्यान दिली. मुंबईत
१ हजार ६०० हून अधिक ठिकाणचे भोंगे हटवले आहेत. ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव
निर्माण होऊ न देता केल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. हटवलेले भोंगे
पुन्हा लावले तर तिथल्या पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल,
असंही त्यांनी सांगितलं.
हरियाणाच्या झज्जर भागात भूकंप
११ जुलै २०२५ रोजी, भारतीय प्रमाण
वेळेनुसार संध्याकाळी ७:४९ वाजता, हरियाणाच्या झज्जर भागात ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा
भूकंप झाला. हा भूकंप २८.६८° उत्तर अक्षांश आणि ७६.७२° पूर्व रेखांशाच्या जवळ १० किलोमीटर
खोलीवर झाला.
तात्काळ कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी
झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. रहिवाशांना
सौम्य हादरे जाणवले.
शिर्डी आणि पंढरपूरच्या
धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार
शिर्डी
आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य
सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात
केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शनिशिंगणापूर
देवस्थानाचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सायबर खात्याच्या
पोलीस उपमहानिरीक्षकांच्या देखरेखीखाली चौकशी आणि कारवाई करू, असंही फडणवीस यांनी नमूद
केलं. आमदार विठ्ठल लंघे यांनी याविषयी लक्षवेधी उपस्थित केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: