विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
विमानतळापासून १५ किमी परिसरात बीम लाईट वापरल्यास गुन्हा दाखल होणार
पुणे : शहरातील लोहगाव येथील तांत्रिक आणि नागरी विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, विमानतळाच्या १५ किलोमीटर परिसरातील हवाई क्षेत्रात आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रखर बीम लाईट (Beam Light) आणि लेझर बीम लाईट (Laser Beam Light) वापरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश बुधवार, ०९/०७/२०२५ पासून पुढील ६० दिवसांसाठी लागू राहील.
भारतीय वायुसेनेने निदर्शनास आणून दिले आहे की, लोहगाव विमानतळाच्या वायुक्षेत्राजवळ आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रमांदरम्यान आकाशामध्ये प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर केला जातो. रात्रीच्या वेळी विमानांना उतरताना आणि उड्डाण करताना, वैमानिकांना दिशा आणि ठिकाण दाखवण्यासाठी रनवेवर आणि एटीसी टॉवरकडून संकेतासाठी लाईटचा उपयोग केला जातो. अशा परिस्थितीत, प्रखर बीम लाईटमुळे वैमानिकांच्या डोळ्यांना त्रास होऊन दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते,
या गंभीर धोक्याची दखल घेऊन, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत हा प्रतिबंधक आदेश जारी केला आहे. त्यांना या कलमान्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करून विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा कार्यक्रम आयोजक लोहगाव वायुसेना व नागरी विमानतळाच्या साधारणपणे १५ किलोमीटर अंतराच्या वायुक्षेत्र परिघामध्ये आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईट आकाशात सोडू शकणार नाहीत. या सुधारीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील.
Public Safety, Aviation, Police Order, Pune
#PunePolice #AviationSafety #BeamLightBan #PuneAirport #PublicOrder #FlightSafety #LaserLight

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: