'मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आतापासूनच तयारी करा' - दिनेश वाघमारे
पुणे, ११ जुलै २०२५: आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी, तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVMs) प्राथमिक तपासणी करून ती मतदानासाठी सज्ज ठेवावीत, असे महत्त्वपूर्ण निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत ते बोलत होते.
आयत्या वेळची धावपळ टाळण्यासाठी दक्षता:
आयुक्त वाघमारे यांनी सर्व महानगरपालिकांना आतापासूनच निवडणुकांच्या तयारीबाबत दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल, असे ते म्हणाले. मतदार संख्या, मतदार केंद्रे, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची उपलब्धता विचारात घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
समन्वय आणि नियोजनावर भर:
या निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांशी समन्वय साधून नियोजनपूर्वक तयारी केली तर ते सहज शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: