'ग्रीन मोबिलिटी'च्या दिशेने शासनाची ठोस पावले
पुणे, दि. ११ जुलै २०२५: पर्यावरणपूरक आणि कार्बन उत्सर्जनमुक्त वाहतुकीसाठी शासन 'ग्रीन मोबिलिटी'च्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. त्यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळी आणि निरामय या संस्थेच्या वतीने ११५ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे आणि निरामय संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, सचिव डॉ. राधिका इनामदार, उद्योजक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, ॲड. मिहीर प्रभूदेसाई आणि सतीश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
'प्रदूषणमुक्त भारताची दिशा':
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, "ग्रीन मोबिलिटीसाठी सायकलिंग, सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोसारखे प्रकल्प, ई-बसेसची खरेदी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला शासन प्राधान्य देत आहे. प्रदूषण कमी करणे, इंधन बचत करणे, आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि कार्बन-न्यूट्रल भविष्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "आपण आज विद्यार्थ्यांना सायकल देत आहोत, म्हणजेच उद्याच्या प्रदूषणमुक्त भारताची दिशा देत आहोत. सायकल केवळ आरोग्यासाठी नाही, तर पृथ्वीच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे." बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड यांच्या वतीने या सायकली प्रायोजित करण्यात आल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: