'आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून काम करा' - पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी, दि. १२ जुलै २०२५: हालअपेष्टा सहन करत आई-वडिलांनी केलेल्या सेवेची जाणीव ठेवून, मिळालेल्या नोकरीचे महत्त्व ओळखून काम करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज रत्नागिरी येथे केले. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नगरपरिषदेच्या २० सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्रे पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, बंड्या साळवी, राहूल पंडित, बिपीन बंदरकर, विजय खेडेकर, स्मिता पावसकर आदी उपस्थित होते.
शासनाचा ऐतिहासिक निर्णय:
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, "तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की, जो सफाई कामगार म्हणून काम करतो, तो कुठल्याही जाती-धर्माचा असला तरी, शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतो. अशा सफाई कामगारांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे. सरकार म्हणून काम करत असताना फक्त मोठ्या लोकांसाठी नाही, तर सर्वसामान्य माणसासाठी, जो शहराची सेवा करतो, त्याला देखील हक्काने नोकरी देण्याचं काम सरकारने केलं."
आधुनिक स्वच्छतेचे आवाहन:
डॉ. सामंत यांनी रत्नागिरी नगरपरिषदेने आधुनिक तंत्रज्ञान वापरून स्वच्छता प्रणाली राबवण्यावर भर दिला. शहरात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देणे नगरपालिकेची जबाबदारी आहे. भविष्यात घनकचरा प्रकल्प आधुनिक पद्धतीने राबवून रत्नागिरी शहर ३६५ दिवस स्वच्छ ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
'हा आदर्श निर्माण करणारा उपक्रम':
लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार कुटुंबाच्या वारसांना नोकरी देणे हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम असून, हे नगरपालिकेचे विधायक कार्य दर्शवते, असे पालकमंत्री म्हणाले. "हा आदर्श निर्माण करणारा कार्यक्रम आहे. कर्मचाऱ्यांना जे पत्र देतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढाकाराने रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो," असे सांगत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.
मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: