पुणे: जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे कार्यालयात कार्यरत असलेला वरिष्ठ लिपीक योगेश दत्तात्रय चवंडके (वय ३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १,५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. एका ५८ वर्षीय तक्रारदाराच्या मोटार अपघात नुकसानभरपाईच्या अपील प्रकरणाची गहाळ झालेली फाईल शोधून पटलावर ठेवण्यासाठी चवंडकेने ही लाच मागितली होती.
तक्रारदार यांचा २०२२ मध्ये मोटार अपघात झाला होता. विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्याने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे येथे अपील दाखल केले होते. मागील सुनावणीच्या तारखेला तक्रारदार कार्यालयात हजर असताना, लिपीक योगेश चवंडकेने त्यांची फाईल गहाळ झाल्याचे आणि ती सापडत नसल्याचे सांगितले होते. फाईल शोधून पटलावर ठेवण्यासाठी चवंडकेने सुरुवातीला २,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २६ जून २०२५ रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने, २६ जून २०२५ रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, योगेश चवंडकेने तक्रारदाराची फाईल शोधून ठेवल्याचे सांगून १,५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
आज, १ जुलै २०२५ रोजी, नवीन प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या आवारात असलेल्या चहाच्या कॅन्टीनजवळ सापळा रचण्यात आला. या सापळ्यात योगेश चवंडकेने तक्रारदाराकडून १,५०० रुपये लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलीस निरीक्षक श्री. प्रविण निंबाळकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी याबाबत माहिती दिली.
संपर्क क्रमांक:
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे: ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
व्हॉट्सॲप क्रमांक (मुंबई): ९९३०९९७७००
ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन ॲप तक्रार: www.acbmaharashtra.net.in
Anti-Corruption, Pune, Bribery, District Consumer Dispute Redressal Commission, ACB Trap
#Pune #AntiCorruption #ACB #Bribery #MaharashtraPolice #ConsumerCourt #CorruptionFreeIndia

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: