उरणमध्ये रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ; वाढत्या संख्येमुळे उत्पन्न घटले

 


कर्जाचे हप्ते आणि कुटुंबाच्या गरजा भागवणे रिक्षाचालकांना कठीण

उरण, दि. ५ जुलै २०२५  : उरण तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या रिक्षांच्या संख्येमुळे रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जाचे हप्ते भरण्यासोबतच कुटुंबाच्या पोटाची खळगी कशी भरायची, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. एकेकाळी मोजक्या रिक्षांमुळे चांगला रोजगार उपलब्ध होत होता, मात्र औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ आणि खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रिक्षा व्यवसायात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण 

रिक्षांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला पुरेसे उत्पन्न मिळेनासे झाले आहे. रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करतानाच कसरत होत असल्याने, उरलेल्या उत्पन्नातून मुलांची शाळेची फी, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य यांसारख्या वाढलेल्या खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे. याशिवाय, संघटनेबाहेरचे काही रिक्षाचालक कमी पैशांमध्ये प्रवासी भाडे मारत असल्याने, त्याचा मोठा फटका संघटनेतील रिक्षाचालकांना बसत आहे.

बेरोजगार तरुणांवर परिणाम; परमिट धोरणात बदलाची मागणी

या रिक्षा व्यवसायात मोठ्या प्रमाणात बेरोजगार मराठी तरुण आहेत. आधीच नोकऱ्यांची कमतरता असताना, आता व्यवसाय करूनही पोट भरत नसल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीत नोकऱ्या असलेले किंवा आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक नागरिकही या धंद्यात उतरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, शासन आर्थिक परिस्थिती किंवा इतर कोणत्याही बाबींचा विचार न करता सरसकट सर्वांना परमिट देत आहे. त्यामुळे ज्यांना कोणाचाच आधार नाही, जे बेरोजगार आणि गरीब आहेत, त्यांच्या पोटावर पाय पडत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. ज्यांना नोकऱ्या आहेत किंवा जे श्रीमंत आहेत, त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी किंवा चालवण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

रिक्षा संघटना अध्यक्षांकडून प्रशासनावर ताशेरे: 

"रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे भरपूर दंड वसूल केला जातो. ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित व योग्य असतील अशा बेरोजगारांनाच रिक्षा चालविण्याची परवानगी दिली पाहिजे. ज्यांना नोकऱ्या आहेत, तसेच जे श्रीमंत आहेत, त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. हल्ली रिक्षा चालवणे परवडत नाही, कारण महागाई वाढली आहे. सीएनजी बाटला पासिंगचे दर वाढले आहेत. सर्वच बाबतीत शासनाने फी वाढवून ठेवली आहे. जे रिक्षा स्क्रॅपच्या आहेत त्यांनाही एचआरपी (HRP) नंबर दिले जात आहेत. उरण-मोरा रोडवर अशा रिक्षा भरपूर आहेत, पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. सर्वसामान्य रिक्षा चालकांना जगणे मुश्किल झाले आहे. नवीन रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे स्पर्धा निर्माण झाली असून, स्पर्धेत टिकणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे."

  • दिनेश हळदणकर, अध्यक्ष, रिक्षा संघटना, गणपती चौक, उरण शहर


Uran Rickshaw Drivers, Income Decline, Unemployment, Permit Policy, Auto Rickshaw Union, Cost of Living, Economic Hardship

#Uran #RickshawDrivers #Unemployment #IncomeDecline #Maharashtra #AutoRickshaw #EconomicCrisis #PublicTransport

उरणमध्ये रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ; वाढत्या संख्येमुळे उत्पन्न घटले उरणमध्ये रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ; वाढत्या संख्येमुळे उत्पन्न घटले Reviewed by ANN news network on ७/०६/२०२५ १०:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".