रत्नागिरी, १५ जुलै २०२५ : रत्नागिरी येथे आज जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) आपला 'स्मार्ट मित्र' बनवून स्वतःमधील कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल कौशल्याद्वारे युवा सक्षमीकरण' या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
AI च्या मदतीने 'कौशल्ये' वृद्धिंगत करा: प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, नैसर्गिक बुद्धिमत्तेने जरी कृत्रिम बुद्धिमत्तेला जन्म दिला असला तरी, त्याला योग्य सूचना देऊन आपल्याला हवे असलेले काम झटकन पूर्ण करता येते. सरावाने आणि सृजनशीलतेने स्वतःमधील कौशल्ये अधिक विकसित करावीत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्याचा वापर करून उत्पादनांची निर्मिती, प्रसार आणि विक्री करण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. "प्रत्येक माणसामध्ये असणारी कला कौशल्याच्या जोरावर विकसित झाली पाहिजे. कलाकाराला मरण असले तरी कलेला आयुष्य असते. तिच्या जोरावर कलाकार जिवंत राहत असतो," असे ते म्हणाले. त्यांनी उपस्थितांना काही प्रात्यक्षिकही दाखवून दिले.
या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आनंद देसाई, जिजाऊ सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, सचिव केदार चव्हाण, डॉ. गिरीश पिंगळे, वाल्मिक बिलसोरे, रमजान शेख आदी उपस्थित होते.
युवा सक्षमीकरण आणि संयुक्त राष्ट्रांचा संकल्प
सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्या म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्र संघाने १५ जुलै २०१४ रोजी 'जागतिक युवा कौशल्य दिन' म्हणून १५ जुलै हा दिवस निश्चित केला. देशाला प्रगतीकडे आणि विकासाकडे न्यायचे असेल, तर युवा प्रशिक्षणार्थींमधील कौशल्य वाढीस लागले पाहिजे. त्यासाठी त्यांना चालना देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते, ज्यामुळे त्यांना व्यवसाय आणि रोजगार मिळण्यास निश्चितच मदत होते. श्री. देसाई आणि ॲड. मांडवकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सिद्धेश पालांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री स्टॉलचीही यावेळी उपस्थितांनी पाहणी केली.
World Youth Skills Day, Ratnagiri, Skill Development, AI Skills, Youth Empowerment, Maharashtra News, Prasant Satpute
#WorldYouthSkillsDay #Ratnagiri #SkillDevelopment #AIForYouth #YouthEmpowerment #Maharashtra #DigitalSkills

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: