रत्नागिरी, दि. २५ : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज 'संविधान हत्या दिवस' पाळण्यात आला. यानिमित्ताने लोकशाहीच्या लढ्या संदर्भात एक माहितीपूर्ण पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशिका यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि सहायक आयुक्त दीपक घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आणीबाणीच्या काळातील लोकशाहीच्या लढ्या संदर्भात कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सूचित केले होते. यामध्ये विशेषतः पोस्टर्स प्रदर्शन आणि आणीबाणीत तुरुंगवास सोसलेल्या व्यक्तींचा गौरव सन्मान करण्याबाबत उल्लेख होता.
या सूचनेनुसार, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात हा 'संविधान हत्या दिवस' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समतादूत आशिष कांबळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करून उपस्थितांना माहिती दिली. समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट दिली. यानंतर सभागृहात उपस्थित सर्वांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा दिलेल्या दिवंगत व्यक्तींना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, गृहपाल दिपक जाधव, गृहपाल रविंद्र कुमठेकर, निरीक्षक अमोल पाटील, लिपीक संतोष खेडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील आघाताची आणि संविधानाच्या महत्त्वाच्या मूल्यांची आठवण करून देण्यात आली.
Emergency 50 Years, Constitution Day, Ratnagiri Collector Office, Democracy, Public Awareness, Maharashtra Event
#Emergency50Years #ConstitutionDay #Ratnagiri #Democracy #IndianConstitution #MaharashtraNews #CollectorOffice #Lokshahi #NeverForget
Reviewed by ANN news network
on
६/२५/२०२५ ०१:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: