पुणे - वनतोड, हवामान बदल आणि जैवविविधतेच्या ऱ्हासासारख्या गंभीर समस्यांवर भाष्य करणारा 'सीडबॉल' या मराठी चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण नुकतेच कोकणात कुंभारखाणी बुद्रुक गावी पार पडले. साज एंटरटेनमेंट निर्मित आणि क्रीपक्यू प्रेझेंट्स यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट साकारला जात आहे. गावाच्या देवराईला वाचवण्यासाठी लहान मुलांनी केलेला संघर्ष या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. झाडे लावा, झाडे वाचवा हा संदेश देणारा हा चित्रपट १० लाख झाडांची लागवड आणि १ कोटी बीजबॉल टॉसिंगच्या उपक्रमासह पर्यावरण चळवळीचे दृश्यरूप आहे.
या चित्रपटात कमलेश सावंत, अवनी चव्हाण, सोनिया संजय, रुद्र पुणवत, चित्रा देशमुख, कल्याणी नाईक आणि विकास थोरात यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. बालकलाकार सलोनी बाळगुडे, अथर्व सुर्वे, ऋग्वेद सुतार आणि विघ्नेश डांगे यांनीही आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. या कथा आणि व्यक्तिरेखा निसर्गप्रेम, जिद्द आणि सामाजिक भान अधोरेखित करतात.
चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी अखिल देसाई यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण अजित सिंग, संगीत ॲलन केपी, नृत्यदिग्दर्शन सुदामा, कला प्रमोद, वेशभूषा गौरी गावंकर यांची तर सहाय्यक दिग्दर्शन ऋत्वी पगार, प्रमोद आणि कोमल यांनी केले आहे. सहनिर्माते ज्योती बडेकर आणि अनिल देवळेकर यांनी या संकल्पनेला भक्कम पाठबळ दिले आहे.
'सीडबॉल' हा केवळ चित्रपट नसून पर्यावरण संवर्धनासाठी केलेली एक जाणीवपूर्वक कलात्मक चळवळ आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पुढील पिढीसाठी हरित भविष्याची बीजे पेरण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. "बीज पेरा, जीवन उगवा" असा सकारात्मक संदेश घेऊन 'सीडबॉल' प्रेक्षकांच्या मनात एक नवा विचार रुजवतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------
#Seedball #MarathiFilm #Environment #TreePlantation #SocialMessage
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०३:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: