चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी - महेंद्र घरत

 


उरण : बी.सी. ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असेच आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आजच्या तरुण पिढीला बी.सी. ठाकूर यांचे कार्य मार्गदर्शक तर आहेच, शिवाय तालुक्यासाठी प्रेरणादायकही ठरणारे आहे, असे गौरउद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी चिरनेर येथे काढले. महावितरण कंपनी पनवेल शाखेचे प्रधान यंत्रचालक प्रिन्सिपल ऑपरेटर बी.सी. ठाकूर हे २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात शुक्रवारी ३० मे रोजी सायंकाळी ७:०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी महेंद्र घरत आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

चिरनेर येथील बी.सी.ठाकूर यांचा पूर्वाश्रमीचा जीवनपट पाहिला तर अंगावर काटा येत असल्याचे महेंद्र घरत यांनी नमूद केले. एकेकाळी त्यांची शिक्षण घेण्याची परिस्थिती नसताना देखील, अगदी हालाखीच्या परिस्थितीत या बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाने शिक्षण घेऊन त्यांनी इलेक्ट्रिक बोर्डात एक महत्त्वाचे उच्च पद मिळविले. या पदावर काम करताना ग्राहकांची तसेच महावितरण कंपनीची प्रतिष्ठा सांभाळून अत्यंत जबाबदारीने कायद्याच्या कक्षेत राहून त्यांनी काम पाहिले. एवढेच नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणून ते जनसामान्यांसाठी तत्परतेने काम करत आले आहेत. ते दूरदृष्टी लाभलेले धडाकेबाज नेतृत्व आहे. विचारांना दिशा देणारे नेतृत्व आहे. त्यांची समाजाला खूप मोठी गरज आहे, अशा शब्दांत घरत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी सत्कारमूर्ती बी.सी. ठाकूर आणि त्यांच्या सहचारिणी माई ठाकूर यांचा सपत्नीक साडी-चोळी, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अनेक चाहत्यांनी सत्कार केला.

सत्काराला उत्तर देताना बी.सी. ठाकूर हे अत्यंत भावुक झाले आणि त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनाचा पाढा वाचला. त्यांचा खडतर प्रवास लोकांना समजला. “रानातून लाकडाची मोळी आणा, नाहीतर आणलेली मोळी धन्यावर किंवा पैशावर विका आणि मगच शाळेत जा,” अशी घरातील आई-वडिलांची गरिबीमुळे अट असताना देखील, लाकडाच्या मोळ्या विकूनच मी शिक्षण घेतले. कारण एकच होते, ती म्हणजे आमची हलाखीची परिस्थिती. मी जन्माला आलो ती परिस्थिती मला नको होती. त्या परिस्थितीवर मला मात करायची होती. म्हणून शाळेबद्दल ओढ धरून जिद्द, चिकाटी, अपार मेहनत व बुद्धीच्या जोरावर जीवनाचा खडतर प्रवास मी केला. या प्रवासात मला अनेकांनी साथ दिली. त्यामुळे आज मी जीवनात सुखी आहे,” असे भावुक उद्गार सत्कारमूर्ती बी.सी. ठाकूर यांनी त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी चिरनेर येथे काढले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बी.सी. ठाकूर यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्याबद्दलचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

-------------------------------------------------------------------------------------------------------

#Maharashtra #Retirement #Inspiration #SocialWork #Chirner

चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी - महेंद्र घरत चिरनेरचे बी.सी.ठाकूर यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी - महेंद्र घरत Reviewed by ANN news network on ६/०१/२०२५ ०३:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".