डोंबिवली ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
पुणे: डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरातून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्वतःच्या कर्तृत्वाने स्थान निर्माण केलेले, भाजपचे निष्ठावान नेते श्री. रविंद्र चव्हाण यांचा २५ वर्षांचा प्रवास आता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीने अधिकच उंचावला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून, तसेच अथक परिश्रमांच्या बळावर त्यांनी हा मैलाचा दगड गाठला आहे.
२००२ साली भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, २००५ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक आणि त्यानंतर २००७ मध्ये स्थायी समिती सभापती म्हणून पुढे सरकला. २००९ मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर, त्यांनी सलग २०१४, २०१९ आणि २०२४ असे चार वेळा आमदारकीचा विजयी चौकार साधला आहे.
२०१६ साली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. यावेळी त्यांनी बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या चार खात्यांचा कार्यभार सांभाळला, तसेच रायगड आणि पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार म्हणून ते नावारूपाला आले.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (२०२२) कॅबिनेट मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या दोन खात्यांची धुरा सांभाळताना, त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवली. त्यांच्या कार्यकाळात ९२ हजार कोटी रुपयांची रस्ते आणि पुलांची कामे पूर्ण झाली, ज्यात २३ हजार ८८६ किमी लांबीचे रस्ते आणि १ हजार ०५४ पुलांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे सर्वाधिक टप्पे त्यांच्या समन्वयामुळे पूर्णत्वास गेले. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, विमानतळ यांसारख्या २२ पायाभूत सुविधांसाठी त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) स्थापन झाले.
जनसेवेतही रविंद्र चव्हाण कायम अग्रेसर राहिले आहेत. त्यांनी "आनंदाचा शिधा" आणि "रेशन आपल्या दारी" यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांचा घराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन दान केली, जो त्यांच्या हळव्या आणि संवेदनशील स्वभावाचे द्योतक आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर भक्त असून, मॉरिशसमधील सावरकर पुतळ्याच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे सहकार्य होते.
डोंबिवली शहराला ते आपले घर मानतात आणि डोंबिवलीकरांना परिवार. गेली १६ वर्षे 'डोंबिवलीकर' मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी कला, क्रीडा, साहित्य आणि संस्कृतीला वाव दिला आहे. 'आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार', 'डोंबिवलीकर सुपर सिंगर', 'डोंबिवलीकर सुपर डान्सर' यांसारखे उपक्रम तसेच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रीसारखे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ते मोठ्या उत्साहात आयोजित करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील 'डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी' संरक्षण दलात जाण्यासाठी इच्छुक युवकांना मोफत प्रशिक्षण देते.
अलिकडेच, जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती डोंबिवलीत उभारण्यात त्यांच्या पुढाकार होता, ज्याचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. त्यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, तर श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी शरयू नदीजवळ भक्त निवास उभारणीचे भूमीपूजनही त्यांच्याच नेतृत्वात झाले. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, काँग्रेस, शेकाप यांसारख्या पक्षांतील नेते आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Maharashtra Politics, BJP Leader, Ravindra Chavan, Social Work, Infrastructure Development
#RavindraChavan #MaharashtraPolitics #BJP #Dombivli #PublicWorks #SocialWork #MaharashtraLeader #PoliticalJourney

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: