रत्नागिरी, दि. ३० जून: रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३० जून रोजी मध्यरात्रीपासून ते १४ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.
हा आदेश जारी करण्यामागे अनेक कारणे आहेत. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम पूर्ण न झाल्याने या विरोधातही आंदोलने होत आहेत. अशा वेळी, मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय, २७ जून ते ६ जुलै २०२५ या कालावधीत मोहरम सण साजरा केला जात असल्याने जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा मनाई आदेश काढण्यात आला आहे.
या कृत्यांना आहे मनाई:
शारीरिक दुखापत करू शकणारी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरी, लाठ्या किंवा इतर कोणतीही वस्तू घेऊन फिरण्यास.
अंग भाजून टाकणारे दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरण्यास.
दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकण्यासाठी वापरता येणारी साधने बरोबर घेऊन फिरण्यास, गोळा करण्यास किंवा तयार करण्यास.
सभ्यता किंवा नीतिमत्तेच्या विरोधात किंवा शांतता धोक्यात आणणारी भाषणे करण्यास, सोंग आणण्यास, किंवा कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करून लोकांमध्ये प्रसार करण्यास.
व्यक्ती, प्रेते किंवा आकृत्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करण्यास.
सार्वजनिक ठिकाणी घोषणा करण्यास, गाणी गाण्यास किंवा वाद्य वाजवण्यास.
पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र येण्यास मनाई आहे.
यांना आदेश लागू नाही:
हा प्रतिबंधात्मक आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्नसोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे जसे की सिनेमागृह, रंगमंच इत्यादींना लागू असणार नाही.
परवानगीने सभा, मोर्चा शक्य:
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा, मिरवणुका किंवा सभा, तसेच निवडणूक प्रचार सभांचे आयोजन करायचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
Public Order, Section 144, Ratnagiri, Maharashtra Police, Law and Order, Prohibitory Orders, Social Harmony
#Ratnagiri #Jamevbandi #ProhibitoryOrders #MaharashtraPolice #LawAndOrder #Section144 #PublicSafety #Moharram #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: