मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या तर्कहीन दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रातील पराभवाचे खापर मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर फोडण्याऐवजी, याच वाढीव टक्केवारीमुळे विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवारांकडून त्यांनी वास्तव जाणून घेतले असते, तर हवेत तीर मारण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वाढीव टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाकडून यापूर्वीच स्पष्ट खुलासा झालेला असतानाही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पराभवाच्या नैराश्यातून तीच संशयाची राळ उडवल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, त्यांनी काही आकडेवारी सादर करत राहुल गांधींच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले.
फडणवीस यांनी सांगितले की, मालाड मतदारसंघात ११ टक्के (३८,६२५) मतदार वाढले, तरी तेथे काँग्रेसचे अस्लम शेख विजयी झाले. पश्चिम नागपूर मतदारसंघात ७ टक्के (२७,०६५) मतदार वाढले, तेथेही काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूरमध्ये ७ टक्के वाढ झाली, तेथे काँग्रेसचेच नितीन राऊत विजयी झाले. तसेच, पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात १० टक्के (५०,९११) मतदार वाढूनही तेथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मुंब्रा मतदारसंघात ९ टक्के मतदार वाढले, तेथेही शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.
"या निकालाची स्वपक्षीयांकडून माहिती घेतली असती, तर अशी निरर्थक निशाणबाजी करण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आली नसती," असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले. काँग्रेसमध्ये संवाद आणि समन्वयाचा संपूर्ण अभाव असल्यामुळेच राहुल गांधी यांचा मुखभंग झाला आहे, असा बोचरा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधींच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे.
Maharashtra Politics, Assembly Elections, Devendra Fadnavis, Rahul Gandhi, Congress, BJP, Election Results, Political Criticism
#MaharashtraPolitics #DevendraFadnavis #RahulGandhi #AssemblyElections #CongressDefeat #BJP #PoliticalDebate #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
६/२४/२०२५ ०६:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: