नवीन आराखड्यात स्वतंत्र कोठडी आणि पर्यावरणपूरक सुविधांचा समावेश असावा
मुंबई, दि. ५ जून २०२५: आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची तातडीची गरज असून, या नवीन आराखड्यात कर्मचारी निवासस्थाने, तसेच पुरुष, महिला आणि तृतीयपंथी कैदी तसेच न्यायाधीन कैदी यांच्यासाठी स्वतंत्र कोठडी असावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. बहुमजली, पर्यावरणपूरक आणि जास्तीत जास्त 'ग्रीन एनर्जी'चा वापर असणाऱ्या कारागृह निर्मितीसाठी मुंबई महानगरपालिकेला वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) बाबत नियमात शिथिलता देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सूचित केले.
मंत्रालयात आयोजित आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाबाबतच्या बैठकीत राज्यमंत्री कदम बोलत होते. यावेळी गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, सहसचिव श्री. धपाटे, तसेच नगरविकास व कारागृह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, बहुमजली कारागृहाचा प्रस्ताव सादर करताना जगातील अशाच प्रकारच्या कारागृहांचा अभ्यास करण्यात यावा. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजनांचा समावेश आराखड्यात असावा. आर्थर रोड कारागृहाप्रमाणेच भायखळा येथील कारागृहाच्या पुनर्विकासाबाबतही आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
नवीन कारागृह निर्मितीसाठी मानखुर्द येथील २२ एकर जागेची पाहणी करावी. भविष्यात नवीन कारागृह निर्मिती करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी या जागेवर आरक्षण टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री कदम यांनी यावेळी दिल्या.
#ArthurRoadJail #Mumbai #JailRedevelopment #YogeshKadam #MaharashtraGovernment #EcoFriendlyPrison #UrbanDevelopment #Mankhurd #HomeMinistry
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ १०:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: