"मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातली प्रतिष्ठा प्रचंड वाढली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आभार मानले. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

मोदी सरकारच्या जनहिताच्या योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती

या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल भातखळकर, आमदार संजय कुटे, आमदार सीमा हीरे, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मोदी सरकारच्या कार्यकाळातील जनहिताच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. याच काळात देशातील विविध विकास योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असून, महाराष्ट्र मोदी सरकारचा आभारी असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील विकासाचे आकडेवारीसह विश्लेषण

फडणवीस यांनी राज्यातील रेल्वेच्या पावणेदोन लाख कोटींच्या प्रकल्पांचा उल्लेख करत, यूपीए सरकारच्या दहा वर्षांपेक्षा अधिक निधी मोदी सरकारने एका वर्षात दिल्याचे सांगितले. मोदी सरकारच्या सहकार्यातून राज्यात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटींची कामे सुरू आहेत. एका वर्षात ३० लाख गरिबांची घरे मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सर्व याद्या पूर्ण झाल्या असून, 'प्रत्येकाला घर' हा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गरिबांचे जीवनमान उंचावले, थेट लाभ हस्तांतरणात ४२ लाख कोटी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजनांची माहिती देताना सांगितले की, कोविड काळापासून ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य, १२ कोटी शौचालये, मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया अंतर्गत अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना १४ हजार ७०० कोटींचे कर्ज यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे. ५५ कोटी जनधन खाती उघडली गेली, ५१ कोटी लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळाला, तर आयुष्मान भारत योजनेत ७७ कोटी खाती नोंदविली जाऊन कोट्यवधी गरिबांना मोफत आरोग्य सेवा मिळत आहेत. मोदी सरकारने आतापर्यंत थेट खात्यात ४२ लाख कोटी रुपयांचे लाभ दिले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

'विकास भी, विरासत भी' आणि देशाची जागतिक भरारी

मोदी पर्वात लाखो घरांचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले असून, गरिबांची घरे विजेने उजळली आहेत, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सर्वसमावेशक चेहरा असून ६० टक्के मंत्री अनुसूचित जाती-जमातींचे आहेत. सरकारच्या योजनांचे ८० टक्के, प्रधानमंत्री आवास योजनेत ४५ टक्के, विविध शिष्यवृत्त्यांचे ५८ टक्के आणि मुद्रा योजनेतील ५१ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती-जमातीचे असल्याचे आकडेवारीसह त्यांनी सांगितले. समाजातील वंचित लोकांना थेट लाभ मिळाल्याने २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. कृषी क्षेत्रात पाच पटींनी वाढ झाली असून, पीएम किसान योजनेअंतर्गत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३.७ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

देशातील विदेशी गुंतवणुकीचा वेग वाढला असून, महाराष्ट्राचा यात मोठा वाटा असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून परिवर्तन आणले, तसेच संरक्षण उपकरणांत भारत स्वयंपूर्ण बनला आहे. चांद्रयान-३ मोहिमेने भारताचे अंतराळ क्षेत्रातील जागतिक महत्त्व अधोरेखित केले आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला भारत पुढील तीन वर्षांत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'विकास भी और विरासत भी' या मोदींच्या विचारातून सांस्कृतिक व धार्मिक स्थळांच्या सुधारणेलाही मोठा निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.



  •  Political News, Central Government, Modi Government, Devendra Fadnavis, BJP, Development, Economic Growth, Social Schemes, India, Maharashtra, Press Conference
  • #ModiGovernment #DevendraFadnavis #VikasitBharat #MaharashtraDevelopment #BJP #GlobalIndia #EconomicGrowth #SocialSchemes #IndianPolitics #MarathiNews
"मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "मोदी आणि भारत हे जागतिक समीकरण" :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०६:४४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".