पुणे, दि. १३ जून २०२५: कसबा मतदारसंघात 'स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा' या अभियानाला आणखी गती देण्यासाठी ‘मिशन १०० दिवस’ राबवण्यात येणार आहे. या मिशनअंतर्गत ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ या अनोख्या बूथ-स्तरीय स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मदतीने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली.
कसबा मतदारसंघातील एकूण २७२ बूथवर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक बूथवर स्वच्छता, जनसहभाग, सौंदर्यीकरण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या विविध निकषांवर आधारित मूल्यांकन केले जाईल. यासोबतच आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठीही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
मागील ५ महिन्यांतील सकारात्मक बदल:
फेब्रुवारी महिन्यात ‘क्लीन सिटी इंदूर’च्या दौऱ्यानंतर कसबा मतदारसंघात अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. या काळात ६१ पैकी ४९ क्रॉनिक कचरा स्पॉट (कचऱ्याचे कायमस्वरूपी ठिकाणे) बंद करण्यात आले असून, त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे रात्रपाळीतही नियमित झाडलोट आणि कचरा उचलण्याचे काम प्रभावीपणे होत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच, गेल्या पाच महिन्यांत १२ ते १५ लाख रुपयांहून अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहितीही आमदार रासने यांनी दिली.
‘मिशन १०० दिवस’चे टप्पे आणि शुभारंभ:
‘मिशन १०० दिवस’चा पहिला टप्पा १० जून रोजी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसापासून सुरू झाला आहे. हा टप्पा २२ जुलै, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसापर्यंत चालेल. दुसरा टप्पा २२ जुलै ते १७ सप्टेंबर, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत राबवण्यात येणार आहे.
या अभियानाचा औपचारिक शुभारंभ १५ जून रोजी, शनिवार पेठेतील अहिल्यादेवी कन्या शाळेजवळ आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, सिने अभिनेते प्रवीण तरडे, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे आणि कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष मिलिंद काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आमदार रासने यांचे मत:
यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर आपल्या प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे. ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे आमचे स्वप्न असून, ते साकार करण्यासाठी ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ स्पर्धेसारख्या उपक्रमांद्वारे जनतेचा थेट सहभाग वाढवला जाणार आहे. बूथ पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेमुळे प्रत्येक कार्यकर्ता आणि नागरिक आपल्या परिसराची जबाबदारी घेईल, हीच या अभियानामागची प्रेरणा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपला मतदारसंघ आदर्श ठरेल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
Kasba Peth, Pune, Swachh Bharat, Cleanliness Drive, Mission 100 Days, Hemant Rasane, Mera Booth Sabse Sundar
#KasbaPeth #Pune #SwachhKasba #Mission100Days #CleanlinessDrive #HemantRasane #MeraBoothSabseSundar #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: