पिंपरी, १३ जून २०२५: जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज झाली आहे. येत्या १९ जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी तर २० जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या तयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला असून, तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाहणी दौरा आणि अधिकाऱ्यांना सूचना:
अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची, तसेच पालखी मार्गाची स्वतः पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सर्व संबंधित विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन करावे.” त्यांनी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत, पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत, तसेच पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले.
निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात येणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागत कक्षातील व्यवस्थेची माहितीही अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी यावेळी घेतली. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याचीही दक्षता घेण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
Ashadhi Wari, Palkhi Sohala, Pimpri Chinchwad, Municipal Corporation, Pilgrim Facilities, Sant Tukaram Maharaj, Sant Dnyaneshwar Maharaj
#AshadhiWari #PalkhiSohala #PimpriChinchwad #Wari2025 #SantTukaramMaharaj #SantDnyaneshwarMaharaj #PilgrimFacilities #PMC

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: