खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला कामाचा आढावा
मावळ: मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथील लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला प्रचंड वेग आला असून, सप्टेंबर २०२५ पासून या विमानतळावरील पहिले टर्मिनल कार्यान्वित होणार आहे. इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी असणारे हे भारतातील पहिलेच विमानतळ ठरणार असून, वार्षिक दोन कोटी प्रवासी हाताळण्याची या टर्मिनलची क्षमता असेल. येथून सुरुवातीला आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (आज) प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा सखोल आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला आणखी गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी अदानी एअरपोर्ट विभागाच्या सीईओ मिनल नाईक आणि सिडकोच्या प्रोजेक्ट मॅनेजर गीता पिल्ले यांनी विमानतळाच्या कामाचे सविस्तर सादरीकरण केले. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, अतुल भगत, उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे, पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर, तसेच इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी सांगितले की, पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या पनवेलमध्ये हे महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाला मेट्रो १, मेट्रो २, मेट्रो ३, वॉटर टॅक्सी, स्थानिक लोकल ट्रेन सेवा आणि भविष्यातील मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनची थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी देखील प्रदान केली जाणार आहे. हे विमानतळ प्रदूषणरहित 'ग्रीन एअरपोर्ट' संकल्पनेवर आधारित असून, ११५० हेक्टर इतक्या मोठ्या परिसरात याचा विस्तार होत आहे. विमानात इंधन भरण्यासाठी अंडरग्राउंड पाईपलाईन (ASF) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे, ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल.
सप्टेंबर २०२५ पासून टर्मिनल एक सुरू होईल, ज्याची वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असेल. सन २०२९ पर्यंत टर्मिनल दोनसह जवळपास ८० टक्के कामकाज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सन २०३६ पर्यंत चारही टर्मिनल्स, एक व्हीआयपी टर्मिनल, जनरल एव्हिएशन (खाजगी विमानांसाठी) आणि देशातील सर्वात मोठे कार्गो डेपो असे संपूर्ण विमानतळ १०० टक्के विकसित होणार आहे. या विमानतळावर ३.७ किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा रनवे असणार आहे, ज्यामुळे मोठी कार्गो विमाने आणि एअरबस ए३८० सारख्या प्रचंड विमानांचे लँडिंग आणि उड्डाण सहज शक्य होईल. मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत या नव्या विमानतळाची प्रवासी आणि विमानांच्या दळणवळणाची क्षमता जवळपास दुप्पट असणार आहे.
खासदार बारणे यांनी विश्वास व्यक्त केला की, "विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर चालू होईल. सर्व वाहतूक व्यवस्थेला विमानसेवा जोडल्या जाणार आहेत, यामध्ये मेट्रो, भूमिगत रेल्वे, बुलेट ट्रेन या सेवेचा समावेश आहे. २०२९ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने पूर्णपणे उड्डाणे घेतील. देशातील महत्त्वाचे व मोठे विमानतळ म्हणून याकडे पाहिले जाते. या विमानतळासाठी केंद्र सरकार आणि सिडको यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल."
Navi Mumbai, Airport, Infrastructure, Aviation, Srirang Barne, Development Project, Connectivity, Green Airport, Maharashtra
#PanvelAirport #NaviMumbai #AirportDevelopment #SrirangBarne #InfraProject #AviationNews #MumbaiConnectivity #GreenAirport #MaharashtraGrowth #DBPatilAirport
Reviewed by ANN news network
on
६/२४/२०२५ ०२:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: