पुणे: पुणे शहरातील पाचगाव-पर्वती, भांबुर्डा आणि वारजे येथील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर करण्यात आलेला २६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वापराविना पडून असल्यामुळे, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. या निधीचा वापर न झाल्याने टेकड्यांवरील सुरक्षा आणि पर्यावरणीय संवर्धनाची कामे रखडली आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीने २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी हा निधी मंजूर केला होता. यामध्ये दरवर्षी ५ कोटी २५ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन होते. मात्र, प्रशासकीय पातळीवर कार्यवाही न झाल्याने हा निधी वापरला गेला नाही.
आमदार रासने यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या निधीच्या तातडीने वापराची मागणी केली आहे. ते म्हणाले, "या निधीचा वापर सुरक्षा भिंतीचे बांधकाम, वृक्षारोपण, रोपवाटिका उभारणे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे यांसारख्या कामांसाठी करायचा होता. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही कामे रखडली आहेत."
यापूर्वी तळजाई टेकडीवर एका युवकावर प्राणघातक हल्ला करून दीड लाख रुपयांची सोनसाखळी लुटण्याची घटना घडली होती. याआधी बाणेर टेकडीवरही अशाच प्रकारे लूटमार झाली होती. यामुळे शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेकड्यांवर सीसीटीव्ही, पॅनिक बटण आणि पोलीस गस्त यांसारख्या उपाययोजनांसाठी निधी मंजूर केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असे रासने यांनी निदर्शनास आणून दिले.
रासने यांनी सांगितले की, पुणे शहरात २००६ मध्ये वनखाते, महापालिका आणि नागरिकांच्या सहभागाने संयुक्त वनव्यवस्थापनाला सुरुवात झाली. यासाठी महापालिका आर्थिक मदत करते. "२००६ ते २०११ या काळात १० कोटी २३ लाख रुपये निधी दिला होता, ज्यापैकी ९ कोटी ६१ लाख रुपयांची कामे झाली. २०१४ ते २०१९ मध्ये ४ कोटी ८० लाख रुपये दिले, त्यापैकी २ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाले. २०२२ ते २०२७ साठी २६ कोटी २५ लाख रुपये मंजूर केले, पण प्रशासकीय दिरंगाईमुळे तो वापरला गेला नाही," असेही त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------------------
#Pune #HillConservation #PMC #PublicSafety #Maharashtra #Funds #Environment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: