पुणे बालजत्रेत शुक्रवारी विविध ज्ञानवर्धक कार्यक्रमांची रेलचेल
पुणे: पुण्यात सुरू असलेल्या बालजत्रेत शुक्रवारी (२३ मे) 'हा खेळ सावल्यांचा' (पपेट शो), 'अभिजात मराठी भाषिक खेळ', 'गोष्टींची डायरी', 'शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिके' आणि 'लेखक तुमच्या भेटीला' अशा विविध ज्ञानवर्धक कार्यक्रमांची मेजवानी लहान मुलांना मिळणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही बालजत्रा आयोजित करण्यात आली आहे. २५ मे पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही जत्रा सर्वांसाठी खुली असून, प्रवेश विनामूल्य आहे. या जत्रेत लहान मुलांसाठी विविध क्षेत्रांतील नवनवीन उपक्रम सादर केले जात आहेत. बालसाहित्य, गोष्टी, विज्ञान व जादूचे प्रयोग, कथाकथन कार्यशाळा, पपेट शो, लेखकांशी गप्पा, पारंपरिक खेळ यांचा यात समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता चैताली माजगावकर भंडारी 'हा खेळ सावल्यांचा' हा पपेट शो सादर करतील. दुपारी २ वाजता 'शिक्षण विवेक'चे ताई-दादा 'अभिजात मराठी भाषिक खेळ' हा उपक्रम घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता पुणे मराठी ग्रंथालयाच्या बालविभागातर्फे 'गोष्टींची डायरी' या कार्यक्रमात मुलांनी लिहिलेल्या कथा सादर केल्या जातील. सायंकाळी ४.३० वाजता केवळ ८ वर्षांचा अथांग सागर मुजुमले पाटील 'शिवकालीन शस्त्र प्रात्यक्षिके' दाखवणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता 'लेखक तुमच्या भेटीला' या सत्रात डॉ. संगीता बर्वे, ल. म. कडू, आबा महाजन आणि एकनाथ आव्हाड हे लेखक मुलांशी संवाद साधणार आहेत.
या बालजत्रेच्या माध्यमातून मुलांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर ज्ञान, कला आणि संस्कृतीचे महत्त्वही शिकायला मिळणार आहे. आयोजकांनी पालकांना आपल्या मुलांना या विविधरंगी कार्यक्रमांसाठी नक्की घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
#Pune #ChildrensFestival #BookFair #Education #Entertainment #Kids #PuneEvents

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: