पिंपरी: "संघटनेसाठी दररोज एक तास द्या, ताकद देण्याचे काम आमच्याकडून केले जाईल," असे आश्वासन उद्योगमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संघटना वाढीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी कासारवाडी येथे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, उपनेत्या सुलभा उबाळे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, गितांजली ढोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, "शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. लाडक्या बहिणीसह विविध लोकोपयोगी योजना राबविल्या. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. मी आणि खासदार बारणे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आहोत. पक्षासाठी दररोज एक तास द्यावा. त्यामुळे संघटन अधिक मजबूत होईल."
पूर्वी एका रात्रीत सभासद नोंदणी होत असे, परंतु आता शिंदे स्वतः लक्ष ठेवून नोंदणीची पडताळणी करत आहेत. शिवसेनेचा निवडणुकांचा पाया सभासद नोंदणी आहे, त्यामुळे ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. घरात जाऊन आपला विचार रुजविला पाहिजे. काम करणारे आणि काम चुकार कार्यकर्ते आम्हाला ओळखता येतात. सर्वांना विश्वासात घेऊन शासकीय समित्यांची पदे वाटली जातील. जो काम करेल, तोच महापालिकेची निवडणूक लढवेल, असेही सामंत म्हणाले.
खासदार बारणे म्हणाले, "आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सदस्य नोंदणी हे चांगले माध्यम आहे. पिंपरी, चिंचवड, मावळमध्ये घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करावी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच घरोघरी जाऊन ऑनलाइन सभासद नोंदणी केली जाते. सदस्य नोंदणीत मावळ मतदारसंघ राज्यात चौथ्या स्थानावर आहे. संघटनेसाठी थोडा वेळ दिला तर १०० टक्के सभासद नोंदणी पूर्ण होईल."
===========================
#ShivSena
#PimpriChinchwad
#UdaySamant
#EknathShinde
#ShrirangBarne
#MembershipDrive
#MunicipalElections
#Organization
Reviewed by ANN news network
on
५/१५/२०२५ ०९:१५:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: