२.७० लाख रुपयांचे दागिने जप्त, तीन चोरीचे गुन्हे उघडकीस
पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याने एसटी स्टँड व पीएमपीएमएल बस स्टॉप परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई केली आहे. एका महिला सोनसाखळी चोराला अटक करून २ लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे स्वारगेट पोलीस स्टेशनमधील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
हा ऑपरेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आला होता. १६ मे २०२५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस अंमलदार सुजय पवार आणि संदीप घुले हे स्वारगेट एसटी स्टँड परिसरात गस्त घालत होते.
गुप्त बातमीदारांकडून त्यांना माहिती मिळाली की शिवाजीनगर पीएमपीएल बस स्टॉप येथे तोंडाला पांढरा प्रिंटेड स्कार्फ बांधलेली, चॉकलेटी रंगाचा टॉप व पिवळ्या रंगाचे लेगिन्स परिधान केलेली एक महिला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आली आहे.
या माहितीनंतर पोलीस अंमलदार सुजय पवार व संदीप घुले यांनी सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर यांना सूचना दिली. त्यांनी तातडीने वरिष्ठांना याची माहिती देऊन कायदेशीर कारवाईचे आदेश घेतले.
पोलिसांनी सापळा रचून सदर महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने तिचे नाव सांगण्यास नकार दिला. तिच्याकडील सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता, तिच्याकडे खरेदीची कोणतीही पावती आढळली नाही.
अधिक कसून तपास केल्यावर तिने कबूल केले की मागील काही महिन्यांपासून ती स्वारगेट एसटी स्टँड परिसरात गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरत होती.
चोरी झालेल्या दागिन्यांच्या वर्णनावरून स्वारगेट पोलीस स्टेशनमधील अभिलेखांची पडताळणी केली असता, सदर दागिने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. महिलेने स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
तपासामध्ये महिलेकडून २ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून स्वारगेट पोलीस स्टेशनमधील सोने चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी ही कारवाई केली आहे.
--------------------------------------------------------------------------------
#PunePolice #GoldTheft #SwargatePolice #CrimeNews #PublicSafety #WomenSafety #PoliceAction #Maharashtra #BusStandSecurity #TheftCase

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: