कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेदरम्यान आयोजित कार्यक्रमात प्रयोगशील आणि विविध स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, "रत्नागिरीचा हापूस आंबा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता जगातील विविध पिकांच्या लागवडीकडे वळण्याची गरज आहे. भात, नाचणी आणि फळबागांच्या लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे."
"नोकरीपेक्षा दहापट अधिक उत्पन्न शेतीतून मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीचा विकास करावा. शेती उत्पन्नावर कोणताही कर नाही. शासनाने अनेक योजना आणल्या आहेत, ज्याचा लाभ घेऊन शेती करणे फायद्याचे ठरू शकते. निसर्ग सुधारण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी बांबू लागवडीला पर्याय नाही," असेही डॉ. सामंत यांनी नमूद केले. पुढील कृषी प्रदर्शन हे राज्यातील सर्वोत्तम प्रदर्शन असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवडीसाठी पूर्वीची १०० टक्के अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय लवकरच घेतला जाईल. दर्जेदार बियाणे आणि खते शेतकऱ्यांना वेळेवर मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करावे. यावर्षीचे १९०० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, जेणेकरून मुंबईसारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल." बांबू लागवडीसाठी ७ लाख रुपयांपर्यंतची सबसिडी दिली जाते आणि त्याची टनावर विक्री होते, ज्यामुळे प्रक्रिया उद्योगात मोठा रोजगार आणि उत्पन्न मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
महसूल राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले की, शेती आता एक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगला उद्देश साधला जात आहे. शेतकऱ्यांनी याचा उपयोग शेतीला मोठा व्यवसाय बनवण्यासाठी करावा. त्यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदणी आणि ॲग्रीस्टॅक पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच, शेतीपूरक व्यवसाय वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामे पूर्ण करावी आणि पाणी अडवण्याची मोहीम राबवावी, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
----------------------------------------------
#KonkanAgriculture
#CashewFarming
#UdaySamant
#BharatGogawale
#YogeshKadam
#AgriculturalDevelopment
#MaharashtraFarmers
#KrishiPradarshan
#Horticulture
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२५ ०८:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: