पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागावर गंभीर आरोप; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड - थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाने केलेल्या कथित साडे आठ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश नानासाहेब वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तत्काळ सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमीमध्ये महापालिकेच्या विद्युत विभागाने गरज नसताना स्टेडियममध्ये हाय मास्ट आणि एलईडी दिवे बसवण्यासाठी सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विद्युत विभागाचे तत्कालीन सहाय्यक शहर अभियंता बाबासाहेब गलबले आणि विद्यमान सहाय्यक शहर अभियंता संजय खाबडे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमीमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळले जात नाहीत. तेथे फक्त खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते. अशा ठिकाणी इतका मोठा खर्च करण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे म्हटले आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने हाय मास्ट आणि एलईडी दिवे बसवण्यासाठी प्रत्येक खांब्यासाठी बारा लाख रुपये असे चार खांब्यांसाठी एकूण ४८ लाख रुपये खर्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी दिलीप वेंगसरकर यांनी भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास आले की अतिशय निकृष्ट दर्जाच्या लाइट्स बसवण्यात आल्या आहेत.
स्थानिक माजी नगरसेवकांकडून ऐकून दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फक्त सहा कोटी रुपयांत संपूर्ण विद्युत व्यवस्था केली असून ती थेरगावच्या व्यवस्थेपेक्षा कितीतरी उत्तम आहे.
तक्रारदाराने स्पष्ट केले आहे की, थेरगाव येथील क्रिकेट ग्राउंड दिलीप वेंगसरकर अकॅडमीने भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्यामुळे हा खर्च अकॅडमीनेच करणे अपेक्षित होते. परंतु विद्युत विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा संपूर्ण खर्च महापालिकेच्या माथी मारण्यात आला. गरज नसताना करदात्या नागरिकांच्या साडे आठ कोटी रुपयांची उधळपट्टी केली गेली आहे.
तक्रारदाराच्या मते, हे सर्व फक्त संबंधित अधिकाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी केले गेले आहे. त्यामुळे बाबासाहेब गलबले आणि संजय खाबडे यांचे पगार आणि मालमत्ता जप्त करून हे पैसे वसूल करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. तक्रारदाराने स्पष्ट केले आहे की, लवकरात लवकर या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल.
#PimpriChinchwadCorruption #ElectricityDepartment #CricketAcademy #PublicMoneyMisuse #MaharashtraCorruption #RTIActivist #GovernmentAccountability #InfrastructureScam #DilipVengsarkarAcademy #MunicipalCorruption

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: