पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पोटाच्या आजारांसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू

 


प्रत्यारोपण केंद्र विकसित करण्याच्या दिशेने पनवेल रुग्णालयाचे महत्त्वपूर्ण पाऊल

पनवेल: राज्य शासनाच्या पनवेल येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात आता पोटाच्या विविध आजारांसाठी (जठरांत्र शल्यचिकित्सा) तसेच यकृत व किडनी प्रत्यारोपणासाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या विभागात रुग्णांना मोफत तपासणी, उपचार व सल्ला मिळणार असल्याने पनवेल परिसरातील पोटाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे. गरज भासल्यास गरीब रुग्णांच्या मोफत अवयव प्रत्यारोपणासाठीही या विभागातर्फे सहकार्य केले जाणार आहे.

राज्यातील पहिल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. वत्सला त्रिवेदी यांच्या हस्ते या बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन नुकतेच झाले. याप्रसंगी रायगड जिल्हा रुग्णालयाचे डॉ. शिंदे, पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील, दोस्त मुंबईच्या अध्यक्षा डॉ. वैशाली जवादे, डॉ. कैलास जवादे, डॉ. अभिजीत बुधकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व दोस्त मुंबईचे स्वयंसेवक उपस्थित होते.

दोस्त मुंबईचे संस्थापक डॉ. कैलास जवादे यांनी सांगितले की, अनेक लोकांचे मूत्रपिंड खराब झाल्याने डायलिसिस सुरू असते. त्यांना प्रत्यारोपणाबाबत माहिती नसते. किडनी प्रत्यारोपण केल्यास त्यांना डायलिसिसपासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे अशा रुग्णांना माहिती देणे, तपासणी करणे व गरज असल्यास प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे. यकृत खराब झालेल्या रुग्णांनाही प्रत्यारोपणाची गरज असते. त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांना प्रत्यारोपणासाठी तयार करणे गरजेचे आहे. प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यापूर्वी अशा प्रकारचा बाह्य रुग्ण विभाग सुरू केल्यास अनेक रुग्णांना फायदा होईल व भविष्यात प्रत्यारोपण केंद्र विकसित करणे सोपे जाईल. या विभागात पोटाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांनाही सल्ला व उपचार मिळणार आहेत. सुरुवातीला किडनी व यकृत प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवले जाईल. पुढील टप्प्यात रुग्णालयास प्रत्यारोपण केंद्र म्हणून विकसित केले जाईल.

डॉ. त्रिवेदी यांनी अवयव दानाचे महत्त्व वाढवण्यावर भर दिला, तर डॉ. पाटील यांनी या सुविधेमुळे रुग्णांना एन्डोस्कोपीसारख्या सुविधा उपलब्ध होतील असे सांगितले. माजी आरोग्य सभापती डॉ. अरुण कुमार भगत यांनी प्रत्यारोपण सुविधा वाढवण्यासाठी गुजरात मॉडेलचा अवलंब करण्याची सूचना केली. डॉ. शिंदे यांनी दोस्त मुंबईच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले.

--------------------------------------

#Panvel 

#Hospital 

#Health 

#OrganTransplant 

#KidneyTransplant 

#LiverTransplant 

#DOSTMumbai 

#Healthcare

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पोटाच्या आजारांसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पोटाच्या आजारांसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू Reviewed by ANN news network on ५/११/२०२५ ०९:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".