पुणे, १२ मे २०२५ : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याची गंभीर तक्रार भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे. त्यांनी पुणे मंडल रेल प्रबंधक राजेश वर्मा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
श्री. खर्डेकर यांनी ६ मे रोजी नागपूरहून पुणे येथे आल्यानंतर अनुभवलेल्या दुर्दशेचे वर्णन केले आहे. सकाळी १० वाजता पुणे रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर त्यांना प्लॅटफॉर्म आणि पोर्च परिसरात प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. "चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती" असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
स्थानकाच्या आवारात रिक्षा आणि टॅक्सींचे वर्चस्व असून प्रवाशांना घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी आलेली वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना केवळ दोनच छोटे दरवाजे खुले असून मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्कीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे स्कॅनरवर बॅग तपासणी योग्यरित्या केली जात नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. "मुख्य दरवाजा बंद करून साईडच्या दोन छोट्या दरवाज्यातून नागरिकांना ये-जा करण्यास सांगण्याचा हेतू समजला नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
श्री. खर्डेकर यांनी तक्रार केल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे नागरिकांकडून समजले आहे. त्यांनी या परिस्थितीत तातडीने सुधारणा होऊन प्रवाशांना दिलासा मिळावा अशी मागणी केली आहे.
-----------------------------------
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२५ ०९:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: