मुंबई, दि. २३ मे २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. २१ मे पासून सुरू झालेल्या या अभियानाची सांगता ३१ मे रोजी होणार आहे. अहिल्यादेवींनी ३०० वर्षांपूर्वी केलेले योगदान आणि त्यांनी जनहितार्थ केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि या अभियानाचे संयोजक विजय चौधरी यांनी दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अभियानाच्या सहसंयोजक वर्षा भोसले, डॉ. स्मिता काळे-बंडगर आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रदर्शने, नाटिका, युवा व महिला संमेलने, शोभायात्रा यांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख करून दिली जाईल, असे चौधरी यांनी सांगितले.
चौधरी म्हणाले, "२९ मे रोजी चांदवड येथील रंगमहाल या होळकर वाड्यात होळकर यांचे वंशज महाराज श्रीमंत शिवाजीराव होळकर, युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर, श्रीमंत अमरजित बारगळ, पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार राहुल आहेर यांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे." या अभियानात अहिल्यादेवींशी संबंधित ४० हून अधिक ठिकाणी मंदिरे, घाटांची स्वच्छता, महाआरती, शिवस्तोत्र पठण, वेदपठण यांसारखे कार्यक्रम होणार आहेत. अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख करून देणारी १० लाख पत्रके आणि २५ हजार पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अहिल्यादेवींचे कार्य शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय मनात ठेवून भाजपने १६ ते १९ मे दरम्यान सर्व संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------#AhilyadeviHolkar #BJP #Maharashtra #CulturalEvents #TristabdiJayanti #PoliticalNews #VijayChaudhary
Reviewed by ANN news network
on
५/२३/२०२५ ०१:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: