नवी दिल्ली, ९ मे २०२५ (वार्ताहर): पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) ने भारतीय जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने चालवल्या जात असलेल्या दिशाभूल करणाऱ्या मोहिमेचे जोरदार खंडन केले आहे. पाकिस्तानमधील काही समाज माध्यमांवरील हँडल्स आणि मुख्य माध्यमांनी एकत्रितपणे या मोहिमेद्वारे भारताविरुद्ध मानसिक युद्ध सुरू केले असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पीआयबी या मानसिक पातळीवरील युद्धाचे सक्रीयतेने खंडन करत आहे. याशिवाय भारतीय माध्यमे आणि सोशल मीडिया वापरकर्तेही चुकीच्या माहितीला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करत चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती आणि पूर्णपणे खोट्या असलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.
पीआयबीने उघड केलेली माहिती
८ मे २०२५ रोजी रात्री २२.०० वाजल्यापासून ते ९ मे २०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजेपर्यंत एकूण सात व्हिडिओंची तथ्य पडताळणी करण्यात आली असून, त्यांचे खंडन करण्यात आले आहे:
१. जालंधरमध्ये ड्रोन हल्ला झाल्याचा खोटा दावा
लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने जालंधरमध्ये ड्रोन हल्ला झाल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जात होता. पीआयबीने या व्हिडिओची तपासणी केली असता तो खोटा असून, शेतात लागलेल्या आगीचा असल्याचे आढळले. व्हिडिओमध्ये ७:३९ pm ही वेळ दर्शवलेली होती, मात्र ड्रोन हल्ले त्यानंतर सुरू झाले होते. याच गोष्टीला जालंधरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
२. भारतीय सैन्याची चौकी उद्ध्वस्त केल्याचा दावा
पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याची चौकी उद्ध्वस्त केल्याचा दावा ऑनलाइन प्रसारित केल्या जात असलेल्या एका खोट्या व्हिडिओमधून केला जात होता. हा व्हिडिओ समाज माध्यमांवरील अनेक बनावट तसेच असत्यापित खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात सामायिक केला गेला. पीआयबीने हा व्हिडिओ तपासून त्यातील दावे पूर्णतः खोटे आणि कारस्थानाचा भाग असल्याचे सिद्ध केले. भारतीय सैन्य दलात "२० राज बटालियन" या नावाची लष्कराची कोणतीही तुकडीच नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.
३. क्षेपणास्त्र हल्ल्याचा जुना व्हिडिओ
पाकिस्तानने भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा करत असलेला एक जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केला जात होता. पीआयबीने या व्हिडिओची तथ्य पडताळणी करून ही माहिती खोटी असल्याचे सिद्ध केले. सामायिक केलेला हा व्हिडिओ प्रत्यक्षात २०२० मध्ये लेबनॉनमधील बैरुत येथे झालेल्या स्फोटक हल्ल्याचा असल्याचे आढळले.
४. राजौरी येथे लष्कराच्या ब्रिगेडवर हल्ला झाल्याचा खोटा दावा
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे लष्कराच्या ब्रिगेडवर हल्ला झाल्याची माहिती मोठ्या प्रमाणात शेअर आणि प्रसारित करण्यात आली होती. तथ्य पडताळणीनंतर, लष्कराच्या कोणत्याही छावणीवर फिदायिनी अथवा आत्मघातकी हल्ला झाला नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. केवळ दिशाभूल करण्याच्या आणि गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने हा खोटा दावा करण्यात आला होता.
५. सीओएएस यांचे बनावट पत्र
एका गोपनीय पत्रात असा दावा करण्यात आला होता की, लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल व्ही. के. नारायण यांनी उत्तर कमांडच्या लष्करी अधिकाऱ्याला लष्करी सज्जतेबाबतचे गोपनीय पत्र पाठवले आहे. पीआयबीने त्याची सत्यता तपासून जनरल व्ही.के.नारायण हे सीओएएस नसून, हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.
६. भारतीय लष्कराने अमृतसरवर हल्ला केल्याचा खोटा दावा
भारतीय लष्कराने अमृतसर आणि आपल्याच नागरिकांवर हल्ला करण्यासाठी अंबाला एअरबेसचा वापर केल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला होता. पीआयबीला हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे आणि एकत्रितपणे चुकीची माहिती प्रसारित करण्याच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे आढळून आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पीआयबीने संरक्षण मंत्रालयाचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी करून सत्य उघड केले आहे.
७. विमानतळांवर प्रवेशबंदी असल्याचा खोटा दावा
भारतातील विमानतळांवर प्रवेशबंदी असल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्यात आली होती. सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे पीआयबीने या वृत्ताचे खंडन केले आहे.
पीआयबीचा सतर्कतेचा संदेश
पीआयबी खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी आणि मिथके उघडकीला आणून राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसेच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत असून, नागरिकांना सोशल मीडियावरील कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.
.......................................
#PIBFactCheck
#FakeNews
#Misinformation
#NationalSecurity
#IndiaAlert
#SocialMediaHoax
#FactChecking
#MediaLiteracy
#CyberWarfare
#PsychologicalWarfare
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०२:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: