सभेच्या सुरुवातीला 'भारत के जवानो' या देशभक्तिपर गीताने वातावरण भारावून गेले. यानंतर प्रबोधिनीचे कार्यकर्ते स्वप्नील इंदापूरकर यांनी हल्ल्यामागील विचारसरणीवर तीव्र टीका करताना, "हल्ला करणारे संपले तरी विचार संपत नाही, हिंसक आणि असंस्कृत विचारांचा पूर्ण नाश आवश्यक आहे," असे स्पष्ट केले.
उपस्थितांनी भगवद्गीतेतील श्लोक म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर 'हिंदू ऐक्याची ध्वजा' हे गीत सादर करण्यात आले.
प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन गाडगीळ यांनी काश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. "१९९४ पासून आजपर्यंत प्रबोधिनीचा काश्मीरमधील प्रवास आणि या हल्ल्याच्या निषेधासाठी उभे राहिलेले स्थानिक मुस्लिम बांधव हे देशाच्या एकात्मतेचे उदाहरण आहे," असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पाकिस्तानप्रेरित या हल्ल्याचा मुख्य उद्देश भारतात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि काश्मीरमधील शांतता भंग करणे असल्याचे सांगितले. याचे प्रत्युत्तर म्हणून त्यांनी बहिष्कारापेक्षा संबंध वृद्धिंगत करण्याची गरज अधोरेखित करत 'रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्स' देण्याचे आवाहन केले.
ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह व सीमावर्ती संपर्क सचिव आशुतोष बारमुख यांनी सभेचा समारोप करताना, "अतिरेकी दोन राष्ट्रांची भाषा बोलतात, पण भारत एक अखंड राष्ट्र आहे. मुस्लिम अतिरेक्यांना ठोस उत्तर देतानाच देशभक्त मुस्लिमांना बळ देणे, हेच राष्ट्रीय ऐक्याचे खरे रूप आहे," असे म्हटले. त्यांनी "कृण्वंतो विश्वम् आर्यम्" या विचारातून कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
सभेत उपस्थित नागरिकांनी भारताच्या नकाशावर आपले विचार लिहून राष्ट्रीय एकात्मतेशी नाते दृढ केले. तसेच देशविघातक कृत्यांना सामूहिक विरोध करणे, शत्रूबोध बाळगणे आणि 'आम्हास काय त्याचे' या भावनेतून बाहेर येण्याची प्रतिज्ञा केली. सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: