विकासाचा दिखाऊपणा नव्हे, प्रत्यक्ष कामाचे आश्वासन
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी सांगवी येथून आपल्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले.
प्रचार फेरीदरम्यान स्थानिक महिलांनी भोईर यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
भोईर यांनी शहरातील भ्रष्टाचार आणि दहशत संपवण्याचा संकल्प व्यक्त केला. त्याचबरोबर इंद्रायणी, पवना आणि मुठा या तीन नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
"केवळ विकासाचा दिखाऊपणा न करता प्रत्यक्ष काम करण्यावर भर देणार आहे. लोकांनी माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी पाहून मतदान करावे," असे आवाहन त्यांनी केले.
सांगवी परिसरातील नागरिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या भेटी घेत भोईर यांनी प्रचार मोहीम सुरू केली असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: