विकासकामांची शिदोरी घेऊन निवडणुकीत उतरणार
पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महिला मतदार 'गेम चेंजर' ठरतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.
दरेकर यांनी 'लाडकी बहीण योजने'चा उल्लेख करत, दीड हजार रुपयांची रक्कम वाढवण्याचे सरकारचे आश्वासन दिले. महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, आघाडीतील काही नेते या योजनेला विरोध करत असतानाच दुटप्पी भूमिका घेत स्वतःच्या कार्यालयातून ती राबवत आहेत.
महाविकास आघाडीच्या काळातील अपूर्ण आश्वासनांचा उल्लेख करत दरेकर म्हणाले की, कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, वीज बिल माफी अशा घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या परंतु त्यांची पूर्तता केली नाही.
युती सरकारच्या कामगिरीचा आढावा देताना त्यांनी पुण्यातील मेट्रो विस्तार, रिंग रोड प्रकल्प, १०६ सिंचन प्रकल्पांना मिळालेली मंजुरी यांचा उल्लेख केला. तसेच शेतकरी सन्मान निधी, कृषी पंपांची वीज माफी अशा योजनांचीही माहिती दिली.
कार्यक्रमास प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: