भोसरी (प्रतिनिधी): तळेगावचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन स्थानिक युवकांच्या सहा लाख नोकऱ्या हिरावल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
सुळे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी चाळीस आमदारांची पन्नास खोकी देऊन खरेदी केल्याचा आणि दोन हजार कोटींचा खर्च केल्याचा गंभीर आरोप केला. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आपली लढाई असल्याचे सांगत त्यांनी पंधराशे रुपये देऊन दाम दुपटीने महागाई वाढवणाऱ्या सरकारला महिला शक्तीच घरी बसवणार असल्याचे स्पष्ट केले.
मेळाव्यास महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर तेलाचे भाव आवाक्यात आणण्याचे आश्वासन दिल्याचेही सुळे यांनी सांगितले.
उमेदवार अजित गव्हाणे यांनी शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे, महिलांना सुरक्षित वातावरण देणे आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०७:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: