"पश्चिमी वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणार - फडणवीस यांची घोषणा"
मुखेड (नांदेड) : मराठवाड्यातील पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुखेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
"पश्चिमेकडील वाहिन्यांमधून समुद्रात वाया जाणारे ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या खोऱ्यात आणून प्रदेशातील दुष्काळ कायमस्वरूपी संपवू," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. २०१९ मध्ये या योजनेचा निर्णय घेतला असला तरी महाविकास आघाडी सरकारने ती रखडवली होती. आता पुन्हा या योजनेला चालना देण्यात आली असून सर्व मंजुऱ्यांसह निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
भाजपाचे लोकसभा उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि विधानसभा उमेदवार डॉ. तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विरुपाक्ष महाराज, खासदार अजित गोपछडे, विष्णूवर्धन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस यांनी २०२८ पर्यंत राज्यात ५० लाख 'लखपती दिदी' तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. "महिलांसाठी 'बेटी बचाव, बेटी पढाओ' पासून लखपती दिदीपर्यंत १४ विविध योजना राबवल्या जात आहेत," असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी किसान सन्मान, मोफत वीज, सौर पंप अशा योजनांबरोबरच कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. स्थानिक विकासासाठी लेंडी योजनेसाठी १६५ कोटींचे पॅकेज मंजूर करण्यात आले असून, डॉ. तुषार राठोड यांना मंत्रिपदाचेही आश्वासन देण्यात आले.
या सभेदरम्यान पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका यांच्या मानधनवाढीचाही उल्लेख करण्यात आला. अडीच कोटी बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले असल्याचीही माहिती फडणवीस यांनी दिली.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०४:४४:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: