"वक्फ कायद्याच्या मनमानीविरोधात गृहमंत्र्यांचा इशारा"
दोंडाईचा (धुळे), दि. १३ - अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. दोंडाईचा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
"महाविकास आघाडी म्हणजे विनाश, तर महायुती म्हणजे विकास," असे सांगत शाह यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत केलेल्या सहानुभूतीपूर्ण विधानावरून त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
गृहमंत्र्यांनी वक्फ कायद्याच्या मनमानीकडेही लक्ष वेधले. कर्नाटकमधील परिस्थितीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, तेथे शेकडो वर्षे जुनी मंदिरे, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि राहती घरेही वक्फ बोर्डाच्या मालकीची झाली आहेत.
येत्या तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे शाह यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात अयोध्या राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतला.
देशाच्या सुरक्षेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या सरकारच्या काळात पाकिस्तानी दहशतवादी बॉम्बस्फोट करून मोकळे होत असत, मात्र मोदी सरकारने उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दहा दिवसांत सर्जिकल स्ट्राईक करून ठोस कारवाई केली.
या सभेला सरकारसाहेब रावल, नयनकुंवर ताई रावल, आमदार अमरीशभाई पटेल, डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०४:३३:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: