म्हातोबा देवस्थानच्या दर्शनाने प्रचार फेरीची सुरुवात
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज वाकड येथील म्हातोबा देवस्थानात दर्शन घेऊन प्रचार मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विजयानंतर वाकडमधूनच विकासकामांचा शुभारंभ करण्याचे आश्वासन दिले.
स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. प्रचार फेरीदरम्यान वाकड गावठाणात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त केला.
तरुणांमध्ये सेल्फी काढण्याचा उत्साह दिसून आला, तर महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. या प्रचार फेरीत माजी नगरसेवक संदीप कस्पटे, विनायक गायकवाड, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवसेना, राष्ट्रवादी व आरपीआय या मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून जगताप यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. वाकडसह संपूर्ण चिंचवड विधानसभा क्षेत्राचा कायापालट करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीत स्थानिक नेते, युवा कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांसह मोठी जनसमुदाय सहभागी झाला होता. वाकडकरांच्या प्रेमळ स्वागताने जगताप यांनी भारावल्याची भावना व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: